15.8 C
Latur
Friday, November 21, 2025
Homeधाराशिवधाराशिव येथील नुकसानीचे क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टरवर

धाराशिव येथील नुकसानीचे क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टरवर

एकाचवेळी पंचनामे व ऑगस्टमधील अनुदान वाटपाचे काम वेगाने सुरु

धाराशिव : मच्छिंद्र कदम
जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये विशेषत: मागील चार दिवसात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक आकडेवारी संकलित झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजनुसार जिल्ह्यातील दोन लाख २६ हजार ७०६ हेक्टवरील पिके व फळबागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. एक हजार ४८ घरांची पडझड झाली असून २०७ जनावरे मृत्यमुखी पडली आहेत. जिल्ह्यातील ३६३ गावांसह एक लाख ९८ हजार ३७५ शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने वेगाने हाती घेतले आहेत.

एकाच वेळी पंचनामे व ऑगस्टमधील शासनाकडून मंजूर अनुदानाचे वाटप करण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम गतीने सुरु आहे. पंचनाम्यानंतर भरपाईसाठी तातडीने निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार असून ऑगस्टमधील अनुदान वाटप आजपासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिली. मागील चार दिवसापूर्वी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलन करण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख दोन हजार ८३९ हेक्टवरील जिरायती, २१ हजार ४४२ हेक्टवरील बागायती व दोन हजार ४२५ हेक्टवरील फळपिकांचे ३३ टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

सर्वाधिक फटका परंडा तालुक्याला तर सर्वात कमी झळ कळंब तालुक्याला बसली आहे. परंडा तालुक्यातील ५२ हजार पाचशे शेतक-यांच्या ३७ हजार जिरायत, १९ हजार बागायती तर दोन हजार शंभर फळपिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून २०७ जनावरे मृत्यू पावले आहेत. दुधाळ जनावरांची संख्या मोठी असून त्यात १६५ मोठी तर ३६ लहान जनावरांचा समावेश आहे. अन्य सहा जनावरे ओढकाम करणारी असल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले.

हजाहून अधिक घरांची पडझड
एक हजार ३७ कच्च्या घरांची पडझड झाली असून सात घरे संपूर्ण पडली असून चार गोठ्यांनाही अतिवृष्टीची बाधा पोहचली आहे. सार्वजनिक मालमत्तेचीही अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. यात पंधरा तलाव फुटूले असून बारा रस्ते व तीन पुलांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे १६ गावांचा संपर्क तुटला होता. आता तो पुर्ववत झाला आहे. विविध ठिकाणी पुरामध्ये अडकलेल्या ४९८ नागरिकांची एनडीआरएफ, लष्कराचे पथक, महसूल विभाग व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकांनी शोध व बचाव कार्य करुन सुटका केली आहे. या सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. जिल्ह्याती परिस्थिती हळूहळू पुर्वपदावर येत असून जिल्हा प्रशासन पंचनामे तसेच अनुदान वाटपाच्या कामावर लक्ष ठेवून आहे. येत्या काळात पावसाचा अंदाज गृहित धरुन शोध व बचाव कार्यासह अन्य उपाययोजनांसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सांगितले.

तालुकानिहाय नुकसानीचा प्राथमिक अंदाज

तालुका – बाधित शेतकरी – बाधीत गावे – बाधीत क्षेत्र हेक्टरमध्ये
धाराशिव – २६ हजार – ५४ – ४४ हजार ६०
तुळजापूर – ३७ हजार – ४८ – ३९ हजार ८५०
उमरगा – ५१ हजार ३४५ – ८१ – ५४ हजार २०६
लोहारा – ६ हजार – ११ – ७ हजार ६९०
भूम – २२ हजार – ३० – १७ हजार ३२०
परंडा – ५२ हजार ५०० – ९१ – ५८ हजार १००
कळंब – २३० – २५ – ३३०
वाशी – ३ हजार ३०० – २३ – ५ हजार १५०

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR