नंदुरबार : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढलेला पाहायला मिळतोय. उन्हाच्या या तीव्र लाटेमुळे उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, नंदुरबार जिल्हा रुग्णालयात विशेष ‘उष्माघात कक्ष’स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात उष्णतेच्या झळा बसलेल्या आणि उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे.
दरम्यान, मार्च ते जुलै या कालावधीत उष्माघाताचा धोका संभावतो. यामुळे या कालावधीत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलाय. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात उष्माघाताचा त्रास एकाही रुग्णाला झाला नसला, तरी सतर्कता म्हणून आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या उष्माघाताच्या कक्षात पाच बेड असून वातानुकूलित व्यवस्था करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात दोन बेड आणि भविष्यात ग्रामपंचायतनिहाय उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी दिली. तसेच आवश्यकतेप्रमाणे बेड वाढवण्यात येतील आणि जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात मुबलक आवश्यक साठा असल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांताराव सातपुते यांनी दिली.