गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांचा पुढाकार, संघर्ष संपणार?
गडचिरोली : प्रतिनिधी
गेल्या अनेक दशकांपासून गडचिरोली जिल्हा नक्षलवादाशी झुंज देत आहे. आता केंद्र आणि राज्य सरकार हा नक्षलवाद संपविण्यासाठी वेगवेगळ््या मार्गाने प्रयत्न करत आहे. परंतु अजूनही हे युद्ध सुरूच आहे. अशा स्थितीत आता नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच शांती नांदण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या ३५ वर्षांत पहिल्यांदाच नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारला हा शांती प्रस्ताव दिला आहे. हा शांती प्रस्ताव सादर करण्यासाठी नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारला एक पत्र पाठवले आहे. गेल्या २ वर्षांपासून केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत वेगवेगळ््या राज्यात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आलेले आहे. यात महाराष्ट्र राज्यासह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिसा, झारखंड या राज्यात नक्षलवादविरोधी कारवाई चालू आहे. पोलिस यंत्रणांकडून नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. त्यामुळेच सध्या नक्षलवाद्यांमध्ये अस्थिरता पसरलेली आहे. गेल्या ६ महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ३० नक्षलवादी व छत्तीसगड राज्यात १५० नक्षलवाद्यांचा खात्मा पोलिसांनी केला. तसेच दीड वर्षात ४०० पेक्षा जास्त नक्षलवादी ठार झाले. केंद्रीय गृह विभागाने २०२६ पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी अभियान राबवले आहे. पण आता युद्धाला पूर्णविराम द्यावा, असा प्रस्ताव नक्षलवाद्यांनी गृहविभागाला पाठवला आहे. त्यामुळे आगामी काळात गडचिरोली जिल्ह्यात शांतता नांदण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृह विभागाला
दोनदा पाठवला संदेश
नक्षल चळवळीचा नेता अभय उर्फ भूपती यांनी हे पत्रक जारी केले. नक्षल संघटना व माओवादी संघटना केंद्र सरकारसोबत चर्चेसाठी तयार असल्याचा संदेश दोनदा गृह विभागाला दिला. परंतु गृह विभागाने प्रतिसाद दिला नसल्याचे पत्रामध्ये उल्लेख आहे. आता जारी झालेल्या नक्षलवाद्यांच्या शांती प्रस्तावाला अख्ख्या देशातील नक्षलग्रस्त भागातील जनतेचे लक्ष लागले आहे.