नगर : प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात शरद पवार राजकीय भूकंप घडवून आणण्याच्या तयारीत आहेत. या भूकंपाची सर्वाधिक झळ भाजपला बसणार आहे. भाजपमध्ये स्थिरावलेले नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
या तिघांची बंद दाराआड तब्बल अर्धातास चर्चा झाली. ही चर्चा नेमकी काय झाली, यावर अधिक खुलासा होऊ शकला नसला, तरी पिचड पिता-पुत्राची घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे. याचबरोबर भाजपचे नगर जिल्ह्यातील गणित फिस्कटणार, असे बेरजेचे राजकारण शरद पवार यांनी सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची नगर जिल्ह्यात गुरुवारपासून शिवस्वराज्य यात्रा सुरू होत आहे. या यात्रेला अकोले इथून सुरुवात होत आहे. पिचड यांच्या बालेकिल्ल्यातून या यात्रेला सुरुवात होत आहे. तत्पूर्वीच शरद पवार यांची पिचड पिता-पुत्रांनी भेट घेतली. त्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकीय घडामोंडीना वेग आला आहे. शिवस्वराज्य यात्रेने पहिला धक्का भाजपला दिला असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.
‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी शरद पवार यांच्यासोबत पिचड पिता-पुत्राची अर्धा तास चर्चा झाली. भाजपमध्ये स्थिरावलेल्या पिचड पिता-पुत्रांनी शरद पवारांची भेट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतल्याने भाजपचे गणित अकोले विधानसभासह राज्यातील आदिवासी मतदारांमध्ये बिघडू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पिचड पिता-पुत्राचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाल्यास भाजपच्या आदिवासी मतपेटीवर मोठा परिणाम होईल, असे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पिचड पिता-पुत्रांनी भाजपला साथ दिली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण ताकद लावून तिथे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले डॉ. किरण लहामटेंना पिचडांविरोधात निवडून आणले. राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार महायुती भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. त्यावेळी आमदार लहामटेंनी अजित पवार यांची साथ केली.
महायुतीत ही जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसला सुटत आहे. त्यामुळे पिचड यांची राजकीय कोंडी झाली होती. ही कोंडी दूर करण्यासाठी पिचड पिता-पुत्रांची पवारांशी झालेली भेट बरेच काही सांगून जाते. एकप्रकारे शरद पवारांसाठी पिचड पिता-पुत्र तुतारी हातात घेणार, असे सांगितले जात आहे.