अहिल्यानगर : प्रतिनिधी
जमिनीच्या वादातून श्रीगोंदा तालुक्यातील ठाणगेवाडी, येळपणे शिवारात जमावाने दोन आदिवासी कुटुंबीयांवर हल्ला करून त्यांची दोन घरे जाळून टाकली. यावेळी कुटुंबांतील पुरुषांसह महिलांनाही लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. सहाजण यात गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी चिमणी शंभू चव्हाण यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात ठका रघू कोळपे, रामा रघू कोळपे, नीलेश ठका कोळपे, बंटी रामा कोळपे यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चव्हाण कुटुंबीय ठाणगेवाडी, येळपणे शिवारात शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या शेजारी चिमाजी भोसले हे कुटुंबासह राहतात. चव्हाण याचे गावातील रघू कोळपे याच्याशी जमिनीचे वाद आहेत. याच वादातून सोमवारी कोळपे कुटुंबीय व त्यांच्या साथीदारांनी चव्हाण यांच्या घरी येऊन त्यांना शिवीगाळ करत शंभू चव्हाण यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. यावेळी फिर्यादीची गरोदर मुलगी मध्ये आली असता, तिलाही मारहाण करण्यात आली. तसेच चव्हाण यांच्या शेजारी राहणारे चिमाजी भोसले व विजू भोसले यांनाही जमावातील लोकांनी लाकडी दांड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मारहाण करणा-या जमावाने चव्हाण व भोसले यांची घरे पेटवून दिली. यात घरातील संसारोपयोगी साहित्य खाक झाले. या घटनेची फिर्याद दाखल झाल्यानंतर बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी जात घटनेची माहिती घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसलेही उपस्थित होते. संबंधित आरोपींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
गर्भवती मुलीला मारहाण
एका गर्भवती मुलीलाही जमावाने लाथाबुक्क्याने मारहाण केली. घटनास्थळी केवळ राख दिसत आहे. कोंबड्या देखील आगीत जळाल्या.