स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे गटाने स्टुडिओत प्रचंड तोडफोड केली. खार येथील ‘युनी कॉन्टिनेंटल’ या थ्री स्टार हॉटेलमध्ये ‘इंडी हॅबिटॅट’ नावाच्या स्टुडिओत कुणाल कामरा याच्या वादग्रस्त गाण्याचे चित्रीकरण २ फेबु्रवारीला झाले होते. ते सोमवारी व्हायरल झाले. एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विडंबनात्मक गाण्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी रविवारी रात्री हॅबिटॅट स्टुडिओवर हल्ला चढवून सेटची तोडफोड केली.या गाण्यातून एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याचा आरोप करत शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार केली. शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी कुणाल कामरा, संजय राऊत, राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या गाण्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. कुणाल कामराचे सीडीआर तपासण्यात येतील तसेच त्याच्या बँक खात्याचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात दिली. कुणाल कामराच्या स्टँडअप कॉमेडी व्हीडीओमध्ये एकनाथ शिंदेंचे नाव न घेता टीका करण्यात आली आहे. कुणाल कामरा स्टँडअप कॉमेडीमधून राजकीय गोष्टींवर व्यंगात्मक टीका करत असतो. राज्यात काही वर्षांपूर्वी झालेल्या सत्तेच्या उलथापालथीनंतर वातावरण ढवळून निघाले होते. त्यावरच कुणाल कामरा आपल्या कॉमेडीमधून व्यक्त झाला. त्याने ‘भोली सी सूरत, आँखो में मस्ती’ या गाण्याच्या चालीवर एक व्यंगात्मक काव्य केले. महाराष्ट्राच्या निवडणुकीत जे झालं त्याबद्दल तो म्हणतो, आधी शिवसेनेने भाजपची साथ सोडली, नंतर शिवसेनेने शिवसेनेची साथ सोडली. त्यानंतर राष्ट्रवादीने राष्ट्रवादीची साथ सोडली.
मतदाराला नऊ बटणांचा पर्याय देण्यात आला, लोक कन्फ्यूज झाले. सुरू त्यांनी केलं होतं… मुंबईत एक खूप चांगला जिल्हा आहे ठाणे… तिथले ते आहेत… ठाणे की रिक्शा, चेहरे पे दाढी आँखो पे चश्मा… हाये… मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आए…! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थट्टा करणे कुमार कामराला अडचणीचे ठरले आहे. गत काही महिन्यांत महाराष्ट्रात स्टँडअप कॉमेडियन जमात गोत्यात येण्याची ही तिसरी घटना आहे. याआधी एका अभिनेत्याची गंमत केल्याबद्दल कॉमेडियनवर हल्ला झाला होता. दुसरे ‘इंडियाज गॉट लेटंट’ हे प्रकरण तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. कामराचे प्रकरण थोडेसे वेगळे आहे. त्याने सत्तेतील एका मोठ्या नेत्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही आदी मुद्दे चर्चेला आले आहेत. विडंबनात्मक काव्यात वैगुण्यावर बोट ठेवले जाते, तसा त्यांना तो अधिकारही आहे परंतु विडंबन करणा-यांनी लक्ष्मण रेषा ओलांडावी का हा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. तुमच्यात धाडस असेल तर तुम्ही निश्चितपणे टीका करू शकता परंतु अशी टीका करण्यामागे अंतस्थ हेतू काय हे ही तपासले जाऊ शकते. कुमार कामराने वेगळे असे काहीच केलेले नाही.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटावर मूळ पक्षातील नेत्यांनी टीका करताना ज्या शब्दांचा वापर केला त्या गुळगुळीत झालेल्या शब्दांचाच वापर कुमारने केला आहे. कुमारला टीका करण्यासाठी कुणी सुपारी किंवा अन्य लाभ दिला होता का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही असे सांगत कामरा याच्यावर कठोर कारवाईची ग्वाही दिली. मी जे काही विडंबन केले आहे त्याचा मला पश्चात्ताप नाही. जर न्यायालयाने मला विचारले तर मी माफी मागेन असे कामराने म्हटले आहे. मी सुपारी घेत नाही असेही त्याने म्हटले आहे. मला धडा शिकवण्याची धमकी देणा-या राजकीय नेत्यांनी हे समजून घेतले पाहिजे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार केवळ शक्तिशाली आणि श्रीमंतांची खुशामत करण्यासाठी नाही. एखाद्या शक्तिशाली सार्वजनिक व्यक्तीची थट्टा केल्याने माझ्या अधिकाराचे स्वरूप बदलत नाही. आपल्या नेत्यांबद्दल आणि आपल्या राजकीय सर्कसबद्दल विनोद करणे बेकायदेशीर नाही असेही कामराने म्हटले आहे. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणे सादर केल्यामुळे शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली. कामरा याने माफी मागावी अशी मागणी केली. परंतु कामराने हाती संविधान घेत दमबाजी करणा-यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत आपले विचार मांडणे हा गुन्हा होत नाही.
शिवसेनेशी ज्यांनी गद्दारी केली त्याचा जाहीर उल्लेख केला त्यात काय चुकले? शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्टुडिओची तोडफोड केल्याबद्दल विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. ज्या शिवसेनाप्रमुखांच्या विचारांवर चालत असल्याच्या बाता शिंदे मारतात त्या बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर अनेक मोठ्या नेत्यांवर अशीच व्यंगात्मक टीका केली होती. त्याचे भान शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांना राहिले नाही. कामराचा स्टुडिओ तोडण्याची काय गरज होती? ही गुंडगिरी नाही तर काय? मुख्यमंत्री नागपूर दंगलीतील आरोपींकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची घोषणा करतात. तोच न्याय कामरा प्रकरणातही लावून शिंदेंकडून नुकसानभरपाई करणार का, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमांची आणि त्यात काम करणा-यांची काही धोरणे असतात आणि त्यांना आचारसंहिता असते.कुठला विषय आक्रमक स्वरूपात मांडणे आवश्यक आहे आणि कुठल्या विषयावर फार चर्चा होणे अहितकारी आहे याचे भान त्यांना असते. म्हणून ते काही बाबी कटाक्षाने टाळतात.
स्टँडअप कॉमेडीसारख्या नवमाध्यमांना असले तरी काही बंधन नसते. कारण ही माध्यमे चालवणारे हे त्या माध्यमातील पहिली पिढी असते. त्यांना कोणाकडून वारसा परंपरेने अथवा गुरू-शिष्य परंपरेने ते माध्यम मिळालेले नसते. त्यांची टीका प्रामुख्याने व्यवस्थेवर, धोरणांवर आणि विचारांवर असते. त्यामुळे अधिक आक्रमक होण्याच्या नादात त्यांचा तोल सुटतो. त्यांची टीका योग्य किंवा अयोग्य असली तरी आपण न्यायाधीशाच्या भूमिकेत नाही याचे भान त्यांनी राखावयास हवे. आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना दुस-याच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही, त्याच्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. ‘नया भारत’ घडतो आहे एवढे नक्की!