लातूर : प्रतिनिधी
शहरातील गुळ मार्केट चौकात नादुरुस्त नळ जोडणीमुळे पाण्याची गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मनपाकडून तातडीने कार्यवाही करत ती जोडणी तोडण्यात आली. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहनही मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील गुळ मार्केट चौकात एका नळ धारकाची जोडणी नादुरुस्त होती. सोमवारी त्यातून पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले.ही बाब लक्षात घेता मनपाने मंगळवारी (दि.२८)तातडीने कार्यवाही करत पाण्याची गळती नेमकी कोठून होत आहे याचा शोध घेतला. मनपाच्या मुख्य वाहिनीला गळती नसल्याचे यातून स्पष्ट झाले परंतु एका नळ जोडूनीतून ही पाणी गळती होत होती. पालिकेने तातडीने ती नळ जोडणी बंद केली. यामुळे पाण्याची होणारी गळती थांबली आहे.
सध्या लातूरकरांना मांजरा प्रकल्पातील मृत साठ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी मनपा काळजी घेत आहे. या बाबीची दखल घेत शहरातील नागरिकांनीही पाणी जपून वापरावे.ज्या नळ धारकांच्या जोडण्या नादुरुस्त आहेत त्यांनी त्या तातडीने दुरुस्त करून पाण्याची नासाडी थांबवावी. पाण्याचा अपव्यय करू नये.उपलब्ध पाणी जपून वापरावे. नळाला तोट्या बसवाव्या. अद्याप पावसाळा सुरू झालेला नसल्याने प्रकल्पात पाणीसाठा लवकर होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.जे नागरिक नादुरुस्त नळ जोडणीमुळे पाण्याचा अपव्य करतील त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली जाईल,असा इशाराही मनपाच्या वतीने देण्यात आला आहे.