लातूर : प्रतिनिधी
येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने खाडगांव येथील स्मशानभूमीत महाविद्यालयातील युवक, युवती व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी मिळून स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता केली. हा उपक्रम महाविद्यालय मागील दहा वर्षापासून नियमितपणे राबवत आहे. या उपक्रमाचे कौतुक विविध प्रसारमाध्यमातून झाले असून, जिल्हाधिकारी यांनीही कौतुक केले आहे. विशेष बाब म्हणजे २०१७ मध्ये न्याय समितीने या उपक्रमाचे कौतुक करुन, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्वच्छता अभियान याबरोबरच स्मशानभूमीत महाविद्यालयाने वृक्ष संगोपन वृक्ष संवर्धन करुन तेथे नंदनवन फुलविले आहे. याबरोबरच महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पांडुरंग शितोळे व प्रा. मोहन बलगोर यांचा वाढदिवस महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यावेळी साजरा केला.
प्रारंभी प्रा. गुरुनाथ देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त्त करतांना महाविद्यालयातील युवक, युवती यांचे उद्घाटन व प्रबोधन करण्याबरोबर सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा दूर करुन युवकांना आदर्श नागरिक होण्यासाठी महाविद्यालयांमधून वैविध्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले जाते. स्वच्छता अभियान हा केंद्र व राज्य सरकारचा उपक्रम महाविद्यालयातून राबविला जातो ते कसे याविषयी माहिती दिली. याबरोबरच माजी कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. कुमार बनसोडे यांनी आजपर्यंत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित उपक्रम व कार्याचा सविस्तर आढावा घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व युवकांच्या जडणघडणीसाठी किती महत्त्वाचे आहे ते सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण हे कार्य करीत असून वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षणासाठी महाविद्यालयातील युवक- युवती यांच्या उत्साहपूर्ण सहभागाविषयी कौतुक करण्याबरोबरच विविध उपक्रमात प्राध्यापकांचा सक्रिय सहभाग यामुळे यशस्वीपणे आपली वाटचाल होत असल्याचा आनंद व्यक्त्त करुन विद्यार्थी व शिक्षकांचे प्राचार्यांनी अभिनंदन केले. सूत्रसंचालन श्रावणी काळे यांनी केले तर आभार कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. माधव पलमंटे यांनी मानले. या स्वच्छता अभियानात प्रा. डॉ. कांबळे बाळू, प्रा. डॉ. माधव पलमंटे, प्रा. डॉ. शितोळे पांडुरंग, प्रा. लोंढे दादासाहेब, प्रा. गायकवाड बापू, प्रा. मोरे एस. पी., प्रा. ढमाले आर.टी. व कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.