भाजपच्या विरोधाला न जुमानता राष्ट्रवादीचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी
महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच मुंबईत विविध पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. या बैठकींमध्ये संभाव्य आघाड्या आणि उमेदवारांविषयी चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुती या दोन्ही आघाड्या मनपा निवडणुकीत एकसंध राहणार का? अशीही चर्चा आहे. दरम्यान, भाजपने नवाब मलिकांच्या नेतृत्वाला कडाडून विरोध केला. परंतु या विरोधाला न जुमानता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई मनपाची जबाबदारी नवाब मलिक यांच्याच खांद्यावर कायम ठेवली आहे.
भाजप आणि शिवसेनेचा विरोध सुरु असतानाच त्यांनी जबाबदारी कायम ठेवली आहे. त्यामुळे महायुतीसोबत चर्चा करण्यासाठी एका समन्वयक समितीची स्थापना करण्यात येण्याची शक्यता आहे. मंत्री अदिती तटकरे, मुंबईचे दोन कार्याध्यक्ष, आमदार सना मलिक यांची एकत्रित समिती स्थापन होण्याची शक्यता आहे. अदिती तटकरे मुंबईच्या संपर्कमंत्री असून महायुतीत चर्चेसाठी त्या उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांना विरोध करत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले होते की, जर नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे नेते असतील, तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू शकत नाही. त्यांच्या विरोधात गंभीर आरोप आहेत. भाजपने स्पष्ट केले आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील गटाशी ते मुंबईत आघाडी करणार नाहीत. असे असतानाही राष्ट्रवादी आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये युती होण्याची शक्यता नाही.
नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन
नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा आरोप आहे. त्यांना २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती आणि ते सध्या जामिनावर आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे.

