नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात झाली असून आरोप-प्रत्यारोपही वाढत आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला दुस-यावर ‘घराणेशाही’चा आरोप करता येणे अवघड ठरणार आहे. कारण या निवडणूक रिंगणात सर्वच प्रमुख पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर नातेवाईक उमेदवार उतरलेले दिसून येत आहेत.
महानगरपालिका निवडणुकीत तब्बल १२ दाम्पत्ये थेट रिंगणात असून, एकूण ४० हून अधिक उमेदवार परस्परांचे निकटचे नातेवाईक आहेत. यामध्ये आई-मुलगी, आई-मुलगा, सासरा-सून, सासू-सासरे-सून, काका-पुतण्या अशा विविध नातेसंबंधांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ राजकीय लढत न राहता कुटुंबीयांमधीलही लढत ठरत असल्याचे चित्र आहे.
या घराणेशाहीच्या यादीत शिवसेना (शिंदे गट), भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यापैकी एकही पक्ष अपवाद नाही. मात्र उपलब्ध भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये नातेवाईक उमेदवारांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते.
एकीकडे पक्ष घराणेशाहीविरोधात भूमिका मांडत असले, तरी प्रत्यक्षात मात्र उमेदवारी वाटपात कुटुंबीयांना प्राधान्य दिले जात असल्याचे हे चित्र स्पष्टपणे दाखवून देते. त्यामुळे यंदाच्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत ‘सर्वपक्षीय घराणेशाही’ हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
१२ कुटुंबांचा वरचष्मा
निवडणुकीत निकटचे नातेवाईक सहउमेदवार म्हणून रिंगणात असल्याने, हे सर्व उमेदवार निवडून आल्यास नवी मुंबई महानगरपालिकेवर काही विशिष्ट कुटुंबांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. गवते, चौगुले, नाईक, म्हात्रे, मढवी, पाटील, सोनावणे, कुलकर्णी, गायकवाड, भोईर, औटी यांच्यासह तब्बल १२ कुटुंबांचा महापालिकेत वरचष्मा राहू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

