सरत्या सालाच्या कडू-गोड आठवणी मागे सोडून, नकारात्मक गोष्टींना तिलांजली देत चांगल्या गोष्टींची अपेक्षा बाळगत नव्या वर्षाचे स्वागत केले पाहिजे. २०२४ हे वर्ष अत्यंत धामधुमीचे गेले. हे वर्ष प्रामुख्याने निवडणुकांचे वर्ष ठरले. आधी लोकसभेची निवडणूक झाली. नंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली. केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणीत नवे सरकार सत्तारूढ झाले. सरत्या वर्षात शेतकरी आत्महत्या, कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, बेरोजगारी आणि महागाई अशा आर्थिक आणि सामाजिक समस्या सोडविण्याचे आव्हान पेलता आले नाही. नव्या वर्षात नव्या सरकारला ते पेलावे लागणार आहे.
नव्या वर्षात रस्ते, लोहमार्ग, बंदरे, विमानतळ अशा विविध पायाभूत सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग, उद्योगधंद्यांना प्रोत्साहन, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, आरोग्य क्षेत्रातील सुधारणा आदी गोष्टींना सरकार गती देईल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान नव्या वर्षात अधिकाधिक सुकर कसे होईल याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त रोजच होत राहतात परंतु वर्षभरात त्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. परंतु सरत्या सालाचा सूर्याेदय झाला की मनात ‘थर्टी फर्स्ट’चे मांडे रचले जातात. वर्ष संपण्याची जाणीव करून देणारा मावळतीचा सूर्य आणि नव्या वर्षाची पहाट घेऊन येणारा सूर्योदय काही क्षणांकरिता का होईना ‘भासते मज नवे नवे’! साल सरले म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातून एक वर्ष वजा झाले. एखाद्याचा वाढदिवस साजरा केला जातो तेव्हाही हीच भावना मनात असते. प्रत्येकाच्या आयुष्यातून वजा होणारे एकेक वर्ष नवे अनुभव देऊन जाते तसेच एकूणच जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोनही देऊन जाते.
निसर्गाचे कालचक्र अविरतपणे सुरूच राहते. ऋतुमान थोडेफार बदलत असले तरी रोजचा उगवणारा सूर्य ठरल्या वेळी उगवतो आणि मावळतो. ठराविक काळानंतर पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे ऋतुचक्र सुरूच राहते. निसर्गाने ऋतुचक्रातून दिलेली काळाचा अनुभव घेण्याची प्रेरणा मनुष्याने आत्मसात केली तर त्याला आयुष्याचा चांगला उपयोग करून घेता येऊ शकतो. भारतीय संस्कृतीनुसार चैत्रपाडव्याला आपले नवे वर्ष सुरू होते. वसंत ऋतूमध्ये निसर्ग बहरलेला असतो. ग्रीष्म ऋतूत त्रासून गेलेल्या मनाला वसंत ऋतू आल्हाद आणि आत्मविश्वास देतो. निसर्गात नवे रूप धारण करण्याची तयारी सुरू असते. या काळात वर्षाला निरोप दिला जातो. दोन्ही वेळा आनंदमय वातावरण असते. होळीच्या निमित्ताने रंगांची उधळण करून निसर्गाबरोबर आपल्याला रंगीबेरंगी आयुष्याचा आनंद घेता येतो. पाश्चिमात्त्य देशांत डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी असते. अशा वातावरणात सरत्या सालाला निरोप दिला जातो. मध्यरात्रीच्या जल्लोषात नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. जीवनात निराशा, सुख-दु:ख अथवा संकटे येतच असतात. त्यांना धैर्याने सामोरे गेले पाहिजे.
सरत्या सालाविषयी खेद न मानता वर्षभरामध्ये आपण नेमके काय कमावले आणि काय गमावले याचा लेखाजोखा ठेवावा लागतो. आपले संकल्प पूर्ण करताना ज्या अडचणी आल्या त्या दूर करून नव्या वर्षात अधिक आत्मविश्वासाने नवे संकल्प सोडावे लागतात आणि संकल्पपूर्तीच्या दिशेने प्रवास सुरू ठेवावा लागतो. कॅलेंडरची पाने जशी बदलत राहतात तशी आयुष्याची पाने बदलत राहण्यात अर्थ नसतो, पुरुषार्थ नसतो! कालमानानुसार माणूस अधिकाधिक प्रगल्भ होत जातो. प्रत्येकाला मिळालेले आयुष्य काळाचाच एक भाग असतो. जे काही आयुष्य मिळाले ते चांगल्या पद्धतीने जगता आले पाहिजे. व्यक्ती किंवा समाजाच्या जीवनशैलीत, कार्यपद्धतीत कोणताच बदल होत नसेल, नवेपणा येत नसेल तर त्याला काही अर्थ नाही असेच म्हणावे लागेल. माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. जणू काही काळालाच त्याने व्यापून टाकले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने आपली प्रगती साधली आहे. परंतु काळ हा या सा-यांना पुरून उरतो हे लक्षात घ्यायला हवे.
माणसाने विज्ञानाच्या जोरावर भौतिक सुखांची लयलूट केली असली तरी एखादे संकट कशा स्वरूपात उभे राहील ते सांगता येत नाही. कोरोना हे त्याचे ताजे उदाहरण आहे. येणारा भविष्यकाळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) असेल हे स्पष्टपणे दिसत आहे. निसर्गावर या कृत्रिम बुद्धिमत्तेचा काय परिणाम होईल ते येणा-या काळातच दिसेल. दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने, वर्षामागून वर्षे जात राहतात. मागे जाणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आपल्या काही खुणा मागे ठेवून पुढचा दिवस भविष्यकाळाच्या स्वाधीन करत असतो. तरीही सरणारा प्रत्येक दिवस स्मरणात राहतोच असे नाही. काही दिवस इतिहासाच्या पानावर आपला ठसा उमटवतात तर काही दिवस केवळ औपचारिकपणे उगवून मावळूनही जातात. नव्या वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला राहील असे म्हटले जात आहे. जगभरात या बुद्धिमत्तेचा मोठा गाजावाजा होत आहे परंतु याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता एआयचे प्रणेते हिंटन यांनीच बोलून दाखवलेली आहे. एआयचे धोके सांगताना ते म्हणाले, पुढील ३० वर्षांत एआयमुळे मानवी उपयोगिता नामशेष होण्याची शक्यता २० टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
शक्तिशाली एआय प्रणालीमुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी त्याच्या नियमावर भर देण्याचे आणि सरकारी हस्तक्षेपाचे आवाहन त्यांनी केले आहे. या प्रणालीमुळे मानवी उपयोगिता कमी होऊन संगणकाचे महत्त्व वाढणार आहे. बेरोजगारी वाढण्याची शक्यता अधिक आहे. सर्व सुविधांमुळे मानवाचे स्वत:च्या बुद्धिमत्तेवरचे अवलंबित्व कमी होऊन मानवी बुद्धीच्या निष्क्रियतेला चालना मिळेल. भविष्यात एआयचा वापर करून संहारक अस्त्रांची निर्मिती होण्याचीही भीती आहे. असो. सरत्या सालात जशी आव्हाने होती तशी नव्या वर्षातही राहणार आहेत. परंतु चांगले काही तरी होईल या आशेवरच माणूस जगतो. जुने वर्ष जाणार तसे नवे वर्ष येणार आणि नव्या आशा राहणार!