मुंबई : प्रतिनिधी
वैद्यकीय शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली व्हावीत, ग्रामीण भागात डॉक्टर पोहोचावेत, या उद्देशाने केंद्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज हा महत्त्वाकांक्षी नारा दिला होता. यातून देशात शेकडो नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता मिळाली. मोठा गाजावाजा करून ही कॉलेजेसही सुरू झाली. परंतु यातील अनेक मेडिकल कॉलेजमध्ये पायाभूत सुविधांची अत्यंत दयनीय स्थिती आहे. भावी डॉक्टरांना उत्तम शिक्षण देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असते. परंतु प्रत्यक्षात रिकामे प्रयोगशाळा हॉल्स, विनाप्राध्यापक वर्ग आणि रुग्णांशिवाय हॉस्पीटल असे चिंताजनक वास्तव समोर आले आहे.
फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने (फिमा) फिमा रिव् ू मेडिकल सिस्टीम या राष्ट्रीय सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यातून देशभरातील नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा, प्राध्यापकांची पदे आणि एकूणच प्रशिक्षणाच्या दर्जात गंभीर कमतरता असल्याचे स्पष्ट झाले.
देशातील २८ हून अधिक राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत हे सर्वेक्षण करण्यात आले. यात सरकार आणि खाजगी वैद्यकीय संस्थांतील वैद्यकीय विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापक अशा एकूण २ हजारहून अधिक जणांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. यापैकी ९०.४ टक्के लोक सरकारी संस्थामधील होते तर ७.८ टक्के खाजगी महाविद्यालयांमधील होते. यातील ७१.५ टक्के लोकांनी पुरेसा रुग्णसंपर्क मिळत नसल्याचे सांगितले तर ५४.३ टक्क्यांनी नियमित अध्यापन सत्र घेतली जात असल्याचे सांगितले. प्रयोगशाळा आणि उपकरणांच्या सुविधा ३१ टक्के ठिकाणी पुरेशा नसल्याचे म्हटले तर प्राध्यापकांची संख्या पुरेशी नसल्याचे बहुतेकांचे म्हणणे आहे. केवळ ४४.१ टक्का कार्यक्षम स्किल्स लॅबची सुविधा असल्याचे सांगण्यात आले.
वेळेवर स्टायपेंड (भत्ता) मिळतो, असे फक्त निम्म्या विद्यार्थ्यांनी सांगितले तर केवळ २९.५ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार ठराविक कामकाजाचे तास होत असल्याचे नमूद केले. ५५.२ टक्के लोकांनी कर्मचा-यांची कमतरता असल्याचे तर ४०.८ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण नसल्याचे सांगितले. बहुतेक वैद्यकीय महाविद्यालयांचा कारभार हा अतिरिक्त कार्यभारावरच चालत असल्याने सुयोग्य प्रशासनाच्या नावाने बोंब असल्याचे म्हटले आहे.
स्थायी इमारतींचा अभाव
राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार या राज्यांतील अनेक नव्याने सुरू झालेल्या मेडिकल कालेजमध्ये अद्याप स्थायी इमारती तयार नाहीत. विद्यार्थ्यांचे वर्ग तात्पुरत्या इमारतींमध्ये तर हॉस्टेल आणि प्रयोगशाळा भाड्याच्या जागांमध्ये हलाखीच्या परिस्थितीत चालतात. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना वीज, पाण्याच्या सुविधेसाठीही प्रशासनावर अवलंबून राहावे लागते. मुलींच्या हॉस्टेलच्या ठिकाणीही पुरेशा सुरक्षा व्यवस्था नाहीत.
दर्जेदार शिक्षण नाही
फक्त मेडिकल सीटस् वाढवून डॉक्टर तयार होत नाहीत. त्यासाठी दर्जेदार शिक्षण, योग्य क्लिनिकल अनुभव आणि कार्यक्षम अधोसंरचना गरजेची आहे. आज ज्या परिस्थितीत डॉक्टर तयार होत आहेत, त्याचा मोठा फटका या वैद्यकीय विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आगामी काळात रुग्णांनाही बसणार आहे. त्यामुळे नवीन कॉलेजला परवानगी देण्यापूर्वी पायाभूत सुविधा आणि अध्यापकवर्गाची काटेकोर तपासणी करणे आवश्यक आहे.