पुणे : प्रतिनिधी
नव्या वर्षाचा पहिला सण म्हणून मकरसंक्रांतीकडे पाहिले जाते. या नव्या वर्षात अनेक वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ केली जाणार आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी देणा-या तीळगुळाच्या दरातही वाढ झाली आहे. तसेच या सणादिवशी महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असतो. या सणादिवशी भेट म्हणून एखादी वस्तू देण्यात येते. यात प्रामुख्याने गृहोपयोगी वस्तू असतात. या वस्तूंच्या किमती देखील वाढलेल्या आहेत. त्यामुळे या दिवशी महिलांचा आर्थिक खर्च वाढणार आहे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी ‘तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे म्हणत सर्वजण एकमेकांना या सणाच्या शुभेच्छा देत असतात. मात्र, वाढलेले तीळगुळाचे भाव आणि बाजारपेठेत विक्रीस असलेल्या साहित्याच्या वाढलेल्या किमती यामुळे संक्रांतीच्या दिवशी सर्वसामान्यांना याची झळ सोसावी लागणार आहे. संक्रांत सणाच्या निमित्ताने बाजारपेठेत लगभग सुरू असल्याचे दिसत आहे. असे असले तरी महिलावर्ग मात्र साहित्य खरेदी करताना आखडता हात घेणार असल्याचे बोलले जात आहे.
तीळगूळ महागला
मागच्या वर्षी तीळगुळाचे दर हे १५० ते १७० रुपये किलो होते. या नव्या वर्षात मात्र तीळगुळाच्या दरात ५५ ते ७० रुपयांची वाढ झाली आहे. सध्याच्या दरानुसार तीळगुळाची सर्वसाधारणपणे १८० ते २२० रुपये किलोने विक्री केली जात आहे.