18.7 C
Latur
Friday, January 3, 2025
Homeअंतरराष्ट्रीयनव्या वर्षात अमेरिका मंदीच्या खाईत ​बुडणार!

नव्या वर्षात अमेरिका मंदीच्या खाईत ​बुडणार!

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
डोनाल्ड ट्रम्प येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत आणि आपल्या निवडणुकीच्या प्रचारांत त्यांनी देशाला पुन्हा महान बनवण्याचे आश्वासन दिले. मात्र, देशाचे वाढते कर्ज हा यामध्ये सर्वात मोठा अडथळा आहे. नवीन वर्ष २०२५ अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी वाईट काळ घेऊन येऊ शकते. कारण नव्या वर्षात जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था मंदीत जाण्याचा धोका आहे. वाढते कर्ज आणि बाजारातील असमतोलपणा यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची शक्यता बळावली असून एक अग्रगण्य गुंतवणूक धोरण मंच स्मॉलकेसच्या वतीने एक अभ्यास केला गेला आहे. त्यात त्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली.

स्मॉलकेसच्या या स्टडीनुसार, सतत वाढणारे कर्ज आणि बाजारातील असंतुलन यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत सापडू शकते. स्टडीनुसार स्टॉक, बिटकॉइन्स, कर्ज गुंतवणूक आणि मेम स्टॉक्समध्ये ज्या प्रकारची वाढ दिसून आली, जे कोविड लॉकडाऊन दरम्यान दिसलेल्या वेडेपणाचे प्रतिबिंब आहे. स्मॉलकेसने म्हटले की, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मंदीचा धोका असताना सोने आणि चांदीमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित इन्व्हेस्टमेंट म्हणून उदयास आली आहे.

सध्या, यूएस फेडरल सरकारचे कर्ज ३६ ट्रिलियन डॉलर्सपुढे गेले असून परिस्थिती अशी आहे की कर्जावरील व्याजाची परतफेड करण्यासाठी खर्च होणारा पैसा देशाच्या संरक्षण आणि आरोग्य बजेटपेक्षा जास्त आहे. आता फक्त सामाजिक सुरक्षा बजेट व्याजाच्या रकमेपेक्षा जास्त असून हीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढील तीन वर्षांत व्याज अमेरिकन सरकारचे सर्वात मोठे दायित्व होईल. स्मॉलकेसचे मॅनेजर उज्ज्वल कुमार हे वेल्थ कल्चरचे संस्थापक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. ते म्हणाले की अमेरिकन अर्थव्यवस्था कधी मंदीत प्रवेश करेल, हे सांगणे फार कठीण आहे. पण उपलब्ध आकडेवारीनुसार परिस्थिती भयावह असल्याचे दिसून येत नाही.

क्रेडिट कार्ड पेमेंटमध्ये
आता डीफॉल्ट वाढले
या अभ्यासानुसार अनेक आर्थिक निर्देशकांनी अमेरिकेत मंदीच्या शक्यतेबद्दल चिंता व्यक्त केली असून क्रेडिट कार्ड पेमेंटमधील डीफॉल्टपासून ते उच्च एस अ‍ॅण्ड पी ५०० ढ/ए प्रमाणापर्यंत येणारा काळ खूप आव्हानात्मक असेल. २०१० नंतर प्रथमच क्रेडिट कार्ड पेमेंट विलंब ४ टक्क्यांपेक्षा जास्त असेल, वाढत्या आर्थिक संकटाचा दबाव आणि ग्राहकांचा खर्च कमी झाला आहे. हे संकेत आर्थिक चढउतार खूप जास्त असल्याचे दर्शवत आहेत.

मंदीत सोन्या-चांदीचा आधार
स्मॉलकेसच्या स्टडीनुसार आर्थिक संकट आणि अस्थिरतेच्या काळात सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणे सर्वात विश्वासार्ह हेजिंग असल्याचे सिद्ध झाले आहे. ऐतिहासिक आकडेवारीनुसार मंदीच्या काळात सोन्याच्या गुंतवणुकीने १०० टक्के तर चांदीच्या गुंतवणुकीने ३०० टक्के परतावा दिला आहे. २००० आणि २००८-०९ मध्ये आणि कोविड काळातही सोने किंवा चांदीने उत्कृष्ट परतावा दिला होता. त्यामुळे आगामी काळात सोने-चांदीमध्ये गुंतवणुकीकडे कल वाढू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR