लातूर : प्रतिनिधी
लातूर-नांदेड महामार्गावर, आष्टामोड जवळील नांदगाव पाटी येथे नेहमीच अपघात होत आहेत, हे अपघात टाळण्यासाठी त्या ठिकाणी विशेष उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सदरील महामार्गाचे नांदेड येथील व्यवस्थापक स्वप्निल कासार यांना सूचना केल्यानंतर त्यांनी तात्काळ कार्यवाही सुरु केली आहे. भविष्यात या ठिकाणी अपघात होणार नाही अशी अपेक्षा आहे.
लातूर-नांदेड महामार्गावर दोन दिवसापूर्वी दुचाकीला चुकवण्याच्या प्रयत्नात एसटी बसचा मोठा आघात झाला. यात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. याच ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले असून अनेकांना त्यात प्राण गमवावे लागले आहेत, अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे यांची दखल घेऊन सूचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी संबंधित विभागाला तत्परतेने कार्यवाही आणि उपाययोजना करण्यात बाबत सुचवीले आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या एसटी बसच्या अपघातानंतर यापूर्वीच्याही अपघाताची माहिती घेऊन त्यांनी सदरील राष्ट्रीय महामार्गाचे नांदेड येथील उपविभागीय अधिकारी स्वप्निल कासार यांच्याशी यासंदर्भाने चर्चा केली. या ठिकाणी नेहमी अपघात का घडतात? याचा अभ्यास करावा, त्याची कारणे शोधून काढून ती दुरुस्त करावीत, यापुढे अपघात होऊ नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना त्यांना दिल्या आहेत.
या अपघातानंतर आलेल्या सूचना लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्गाची उपविभागीय अधिकारी स्वप्निल कासार यांनी अहमदपूर येथील उपविभागीय अधिकारी, आणि तहसीलदार यांच्यासह घटनास्थळी भेट दिली, या ठिकाणी पुन्हा अपघात होऊ नयेत म्हणून वाहनाची गती कमी करणा-या अतिरिक्त रंबल स्ट्रीप बसवणे, या रंबल स्ट्रीपची उंची वाढवणे, चौकात अतिरिक्त स्पीड ब्रेकर बसवणे आदी उपायोजना करण्यात येत असल्याची माहिती घटनास्थळी भेट दिल्यानंतर कासार सांगितले आहे. वाहनधारकांनी घरातून किंवा कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर कोणत्याही रस्त्यावर वाहन चालवताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, आवाहन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले आहे.