नांदेड : प्रतिनिधी
मागील ४८ तासांत नांदेडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. रात्रीत मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे १८ फूट पाणी वाढले अन् सहा गावं पाण्याखाली गेली. एनडीआरएफकडून मदतकार्य सुरू आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये आतापर्यंत पाच जण दगावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हसनाळमधील एक व्यक्ती आणि चार महिला पूराच्या पाण्यात बेपत्ता झाल्या आहेत. आतापर्यंत अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. मुक्रमाबद येथे एका शेतक-याच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यामध्ये लेंडी नदीचे पाणी शिरून ४० जनावरे गुदमरून मृत्यू तर २० जनावरे वाहून गेले आहेत.
नांदेड जिल्ह्यात पूर्व परिस्थिती सांगताना गावक-यांनी हंबरडा फोडला. याची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यामधील शब्द ऐकून डोळ्यातून टचकन पाणी येईल. आमच्या गावात एक गडी मेला, चार बाया वाहून गेल्या त्या अजून सापडल्या नाहीत. एकाएकी पाणी आलं, मागचा दरवाजा मोडून लेकराला आणि सुनेला बाहेर काढलं. सामान गेलं दोन लाख रुपये आणून ठेवले होते तेही गेले. साडेचार महिन्याचे लेकरं घेऊन माळाला आलो. पैसा गेला, सोनं गेलं, जीव वाचवा म्हणून माळावर आलो, असे शब्द त्या ऑडिओ क्लीपमध्ये आहेत.

