28.3 C
Latur
Saturday, May 17, 2025
Homeनांदेडनांदेडला अवकाळीने झोडपले

नांदेडला अवकाळीने झोडपले

वीज पडून १ ठार, उन्हाळी पिके, फळबागांसह घरांचे नुकसान
नांदेड : प्रतिनिधी
दिवसभराच्या उकाड्यानंतर शुक्रवारी सायंकाळी शहर परिसरात धुंवाधार अवकाळी पाऊस झाला. जवळपास एक तास झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी जिल्ह्यातील काही भागातही अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यात नायगाव तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला. अवकाळीच्या तडाख्यात उन्हाळी पिके, फळबागांसह अनेक घरांचे नुकसान झाले.

मान्सून केरळ राज्यात दाखल झाला आहे. मात्र, महाराष्ट्रात अवकाळीने धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी दिवसभर वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी ७ च्या सुमारास हलक्या वा-यासह पावसाच्या धारांना सुरुवात झाली. यानंतर काही वेळात वादळी वा-यासह धुंवाधार पाऊस सुरू झाला. रात्री आठपर्यंत जवळपास तासभर सर्वत्र धुंवाधार पाऊस झाला. यामुळे शहरातील सखल भागासह मुख्य रस्त्यावर पाणी साचले तर वादळी वा-यामुळे रस्त्यालगतचे अनेक बॅनर आडवे झाले तर काही हवेत उडून गेले. पाऊस सुरू असताना वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान शहरासह जिल्ह्यातील काही भागास या वादळी पावसाचा तडाखा बसला. अवकाळी पावसादरम्यान चंद्रकांत सुभाष महागावे (२९, रा. मौजे सांगवी ता. नायगाव) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. तसेच उन्हाळी पिके, फळबागांसह अनेक कच्च्या घरांचे नुकसान झाले.

अनधिकृत बॅनर अखेर
निसर्गानेच हटविले
शुक्रवारी सायंकाळी विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे नांदेड शहर व परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. जोरदार वा-यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये लावण्यात आलेले बॅनर अक्षरश: उडाले. भाजपचे नूतन महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांच्या निवडीचे बॅनर आयटीआय परिसरात लावण्यात आले होते. परंतु वादळी वा-यामुळे हे बॅनर अक्षरश: रस्त्यावर आडवे झाल्याचे दिसून आले. बरेच अनधिकृत बॅनर मनपा कर्मचा-यांनी काढण्यापूर्वीच निसर्गाने ते आडवे केल्याचे दिसून आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR