कंधार : प्रतिनिधी
दि. २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कंधार तालुक्यात अतिवृष्टीचे भीषण चित्र पाहायला मिळाले आहे. सतत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे दुधडी भरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेकडो घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले असून, शेतशिवार पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यातील काटकळंबा, लाडका, हळदा, दहीकळंबा, भूकमारी, धानोरा कवठा, चौकी महाकाया, मंगलसांगवी, गोणार, शेल्लाळी, चौकी धर्मापुरी, देवयाचीवाडी, गुंडा, जाकापूर, चिखली, नारनाळी, आलेगाव ग्रामपंचायत परिसर, बारूळ महादेव मंदिर परिसर, पेठवडज, औराळ व मोहिजा परंडा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून, नाल्यांना आलेल्या पुरामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
विशेषत: लाडका, मानसिंगवाडी, रुई व मौजा परंडा या गावांचा रस्त्याने संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे.
तर तेलूर गावात दोन ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
गावातील अनेक शेतक-यांच्या कापूस, सोयाबीन, उडीद, मुग या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही शेतक-यांच्या हातात निराशाच आली आहे. महागामोलाची बियाणे घेऊन प्रचंड मेहनतीने उभी केलेली पिके एका पुरामुळे वाहून गेली आहेत. इतकेच नव्हे तर कच्च्या मातीची घरे व नव्याने विटा रचलेली घरे पडण्यास सुरुवात झाली आहे. अजूनही पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार कंधार तालुक्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमानाची अपेक्षा ७७८.९० मि.मी. इतकी असताना, यंदा १ जून ते २८ ऑगस्टपर्यंत तब्बल ५५४.२० मि.मी. पाऊस झाला आहे. याच कालावधीत सरासरी ५१६.३०मि.मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात १०७.३४ टक्के पाऊस नोंदला गेला आहे. फक्त गेल्या चोवीस तासांतच ५५.६० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंतचा एकूण पाऊस ५९०.०० मि.मी. इतका झाला आहे. मात्र, गेल्या वर्षी याच कालावधीत ६६६.४० मि.मी. पाऊस झाला होता.
अतिवृष्टीमुळे गावोगावी अडचणी निर्माण झाल्याने उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी तातडीने पाऊसग्रस्त भागांची पाहणी केली. शेतकरी व ग्रामस्थांकडून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून योग्य ती मदत सुरू करावी, अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

