नागपूर : प्रतिनिधी
गेल्या ६ दिवसांपासून नागपूरमध्ये लागू असलेली संचारबंदी हटवण्यात आली आहे. गेल्या सोमवारी नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारानंतर ११ पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ती आता उठवण्यात आली. संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलिसांनी हिंसाग्रस्त भागात रुटमार्चही काढला. गणेशपेठ, कोतवाली, तहसील आणि यशोधरानगर या भागात संचारबंदी उठवताच बाजापेठा उघडायला सुरवात झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबाच्या कबरीवरुन झालेल्या वादानंतर १७ मार्च रोजी नागपूरमध्ये दंगल उसळली होती.
संचारबंदी उठल्यानंतर नागपूर पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी हिंसाचाराचे केंद्र राहिलेल्या भालदारपुरा या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागपूरची स्थिती नियंत्रणात असून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संचार बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. पुढील काळात सोशल मीडियाच्या वापरावर पोलिसांची कडक नजर राहणार असल्याचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी सांगितले.
नागपूरमधील अग्रेसन चौक, चिटणवीस पार्क, शिवाजी चौक, गांधीगेट, महाल मार्केट हंसापुरी, मोमीनपुरा भागातून रुट मार्च काढण्यात आला. संचारबंदी हटवल्यानंतर या परिसरातील दुकाने उघडायलाही सुरुवात झाली. हिंसाचारामुळे नागपुरात निर्माण झालेला तणाव आता निवळला असून जनजीवन पूर्ववत होवू लागल्याने नागपूरकरांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात वाद सुरू आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील कबर हटवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. नागपुरात औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे दंगल झाली.
१०४ जणांची ओळख पटली
नागपूर दंगल प्रकरणात पोलिसांनी चार-पाच तासांत दंगल नियंत्रणात आणली. त्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. या सगळ््यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर पोलिसांनी दंगलीचे सीसीटीव्ही फुटेज, लोकांना मोबाईलवर केलेले चित्रीकरण याआधारे दंगेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली. यात एकूण १०४ दंगलखोरांची ओळख पटली. त्यापैकी ९२ जणांना अटक केली तर १२ जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही जुवेनाईल कायद्याअंतर्गत कारवाई सुरू आहे.