छ. संभाजीनगर : नागपूरची दंगल ही घाणेरड्या राजकारणाच्या षडयंत्राचा भाग आहे. ज्यांनी ही आग भडकावली आहे त्यात नुकसान हे सर्वसामान्यांचेच होत आहे. रस्त्यावरच्या गाड्या, घरं, दुचाकी जाळण्यात आल्या त्या कोण्या मंत्र्याच्या किंवा आमदाराच्या नव्हत्या, त्या सर्वसामान्य लोकांच्या होत्या. त्यामुळे माझी समाजातील सर्वच लोकांना हात जोडून विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीत काहीही करावे लागले तरी राजकारण्यांच्या या घाणेरड्या खेळांना बळी पडायचे नाही.
या घडीला आपण एकत्र उभे राहूया, असे आवाहन एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केले. तीनशे- चारशे वर्षांपूर्वीचा एखादा मुद्दा उकरून काढायचा, दररोज माध्यमांसमोर येऊन भडकाऊ विधानं करायची हा सगळा प्रकार राज्यात दंगली घडवण्याच्या उद्देशाने केला जात आहे का? या देशात आणि राज्यात कायदा आहे की नाही? तुम्हाला जे काही करायचे आहे ते कायद्याने करा, पण सर्वसामान्य लोकांना या घाणेरड्या राजकारणात ओढू नका, अशा शब्दांत इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर तोफ डागली.
नागपूर शहरात काल जो प्रकार घडला त्यावर आता बाहेरून लोक आले होते असा आरोप केला जात आहे. नागपूर हे महाराष्ट्राचे उपराजधानी असलेले शहर आहे, ते छोटे गाव किंवा एखादे खेडे नाही. बाहेरून लोक आले होते आणि त्यांनी दंगल भडकवली असा आरोप करणा-यांनी पोलिस यंत्रणा, गुप्तचर विभाग काय करत होते? हे ही बघितले पाहिजे. ज्या कुणी या दंगलीचे षडयंत्र रचले त्यापैकी कुणाचेही घर, वाहन हल्लेखोरांकडून जाळण्यात आले नाही.
नुकसान झाले ते खासगी आणि सर्वसामान्य लोकांच्या मालमत्तेचे. देशाचे मुख्यमंत्री आणि केंद्रातील एका बड्या नेत्याचे शहर असलेल्या नागपूरमध्ये एखाद्या धार्मिक विषयाच्या राजकारणावरून दंगल भडकावी हे या राज्याला शोभणारे नाही, अशी टीकाही इम्तियाज जलील यांनी केली. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून जातीय सलोखा आणि धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम सत्ताधारी पक्षांकडूनच केले जात आहे.
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री, आमदार दररोज माध्यमांसमोर येऊन भडकाऊ विधानं करत आहेत. यावरून त्यांना इथेही दंगल घडवायची आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. कोणी कितीही प्रयत्न केले तरी मी मात्र माझ्या शहरातील हिंदू, मुस्लिम आणि इतर सगळ्याच जातीच्या लोकांना हात जोडून विनंती करतो, त्यांनी राजकारण्यांच्या घाणेरड्या खेळाला बळी न पडता आपले शहर शांत कसे राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही इम्तियाज जलील यांनी केले.