नागपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर पुन्हा एकदा हादरले आहे. सरकारी रूग्णालयात प्रोफसर म्हणून कार्यरत असणा-या महिलेचा घरातच खून केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांच्या तपासानुसार, डॉक्टर नव-यानेच तिचा जीव घेतला आहे. रॉडने डोक्यावर सपासप वार केल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली, अन् घरातच जीव सोडल्याचे समोर आले. याप्रकरणानंतर नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागात असिस्टंट प्रोफेसर असलेल्या अर्चना अनिल राहुले या महिलेची त्यांच्या राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली. हुडकेश्वर परिसरातील लाडेकर ले-आउट येथे राहणा-या अर्चना यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह घरात आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक तपासात अर्चना यांच्या डोक्यावर रॉडने वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
हुडकेश्वर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. अर्चना यांचे पती डॉ. अनिल राहुले यांनीच त्यांच्या भावाच्या मदतीने ही हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. अनिल हे रायपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर असून, ते आठवड्यातून एक-दोन दिवस नागपुरात येत असत. शनिवारी सायंकाळी ते नागपुरात आले असता घरातून दुर्गंधी येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पोलिस तपासात त्यांनीच ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
चारित्र्याच्या संशयावरून हत्या
चारिर्त्याच्या संशयावरून अनिल यांनी अर्चना यांची हत्या केली असावे, असा अंदाज प्राथमिक तपासातून व्यक्त केला आहे. अनिल याने आपल्या बाहेरगावी राहण्याचा फायदा घेत हत्येचा बनाव रचला आणि ती हत्या दुस-या कोणीतरी केल्याचा आव आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तपास सुरू केला असून, या प्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे.