नागपूर : प्रतिनिधी
औरंगजेबाची कबर हटवल्याबद्दल नागपूरमध्ये झालेल्या निदर्शनांना अचानक हिंसक वळण लागले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानवर कारवाई केली आहे. आज फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. फहीम खानवर नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.
नागपूर शहरात १७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १०० हून अधिक लोकांमध्ये मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) नेते फहीम खान यांचा समावेश आहे. सूत्रांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी नागपूर महानगरपालिकेने खान यांना नोटीस बजावली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोधरा नगर परिसरातील संजय बाग कॉलनीतील हे घर फहीम खान यांच्या पत्नीच्या नावावर नोंदणीकृत आहे. एमडीपी शहर प्रमुख फहीम खान सध्या तुरुंगात आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने (श्ऌढ) ने केलेल्या निदर्शनादरम्यान धार्मिक शिलालेख असलेली एक पत्रक जाळल्याची अफवा पसरल्यानंतर १७ मार्च रोजी हिंसाचार उसळला होता.