नागपूर : विशेष प्रतिनिधी
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असून आता लांब पल्ल्याच्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये, स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसकडे सर्वांचे लक्ष लागले असून लवकरच वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस महाराष्ट्रातही धावणार आहे.
महाराष्ट्रातील लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस म्हणून नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे या लोहमार्गावर ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याची माहिती नागपूर रेल्वेचे डीआरएम विनायक गर्ग दिली. त्यामुळे, आता लवकरच वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसची सफर राज्यातील प्रवाशांना करता येणार आहे. नागपूर आणि, पुणे, मुंबईच्या मार्गावरील प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये १६ कोच असणार असून ताशी १४० ते १६० किमी वेगाने ही ट्रेन धावणार आहे. त्यामुळे, प्रवाशांना आरमदायी स्लीपर प्रवासाचा आनंद घेता येईल. देशातील सर्वात हायस्पीड वंदे भारत ट्रेनने नुकतेच शतक पूर्ण केले असून प्रवाशांनाही या ट्रेनची भुरळ पडली आहे. देशातील लांब पल्ल्याच्या विविध मार्गांवर ही ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद या ट्रेनला मिळत आहे. त्यामुळेच, रेल्वे मंत्रालयाने लांब पल्ल्याच्या वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यावर भर दिला आहे.
कोलकाता ते दिल्ली, नागपूर ते मुंबई अशा मार्गावर ही स्लीपर वंदे भारत धावणार असून प्रवाशांची उत्तम सोय असणार आहे. त्यात, महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत स्लीपर नागपूर ते मुंबई, पुणे दरम्यान धावणार आहे. दरम्यान, अद्याप या स्लीपर ट्रेनचे भाडे किंवा दरपत्रक जाहीर झाले नाही.
स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या अनुषंगाने पुणे, मुंबई व नागपूरकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पुढील काही महिन्यांत नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई दरम्यान स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावण्याची शक्यता आहे. स्लीपर वंदे भारतचे उत्पादन सुरू करण्यात आले असून स्लीपर वंदे भारत कोणकोणत्या मार्गावर सुरू करायची आहे याचा अंतिम निर्णय रेल्वे बोर्ड करणार आहे.