परभणी : जिल्ह्यात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहेत. नागरीकांनी दोन्ही सण शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
दोन्ही सणानिमित्त जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत श्री.गावडे बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी गावडे म्हणाले की, येणा-या काळातील गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभुमीवर शहरातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करुन रस्त्यांची व पथदिव्यांची दुरुस्ती करण्याच्या आणि महावितरणला मिरवणूक मार्गातील डि.पी.ची पाहणी करुन उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समाज माध्यमांवर कोणाचीही भावना दुखविणा-या संदेशाची देवाण-घेवाण करु नये. नागरिकांनी उत्साहात सण साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सण साजरे करताना नागरिकांनी जातीय व धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले. डिजे किंवा इतर संगीताने ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी गैरकृत्य किंवा घटना घडल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीसांना द्यावी. पोलीस, महसूल आणि नगर प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी तयार आहेत असे सांगितले.
या बैठकीत शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी, धर्मगुरुंनी देखील आपल्या सूचना प्रशासनासमोर मांडल्या. बैठकीस विविध विभागाचे विभाग प्रमुख, गणेश मंडळाचे पदाधिकारी, धर्मगुरू यांची उपस्थिती होती.