लातूर : प्रतिनिधी
केंद्र शासन पुरस्कृत १५ व्या वित्त आयोगांतर्गत या वर्षात लातूर शहरातील एकुण २३ ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदिर कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. हे केंद्र सुरु झाल्यापासून संबंधीत परिसरातील नागरिकांना त्यांच्या घराजवळ मोफत प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या केंद्रांच्या माध्यमातून योग्य त्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. या २३ नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त रुग्णांना बा रुग्ण सेवा देण्यात आलेली आहे.
लातूर शहर महानगरपालिकाअंतर्गत गरोदर महिलांना मोफत पीकअप आणि ड्रॉपबॅक सुविधा दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने प्रसुती करीता महिलांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि स्त्री रुग्णालय लातूर येथे विनामुल्य पाठवले जाते. तसेच प्रसूती झाल्यानंतर मातेला घरी सोडण्यात येते. एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत ९१ महिलांना याचा लाभ देण्यात आला आहे. वेळेत सुविधा दिली जात असल्याने शहरातील गोरगरीब जनतेला याचा लाभ होतो. तसेच मृत्युचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
मिशन साद या कार्यक्रमांतर्गत लातूर शहरातील ० ते १ वयोगटातील सर्व बालकांची उमंग ओटीझम, जिल्हाधिकारी कार्यालय व लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कर्णबधिरता तपासणी करण्यात आली. या आर्थिक वर्षात लातूर शहर महानगरपालिकेतील तावरजा कॉलनीतील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, गौतमनगरमधील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात नेत्र तपासणी युनिट कार्यान्वित करण्यात येणार आहे. शहरातील गौतमनगरमधील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व काळेगल्लीतील मनपा दवाखान्यात दंत चिकित्सा केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सर्व ठिकाणी सर्व सुविधा कार्यान्वित करण्यासाठी येणा-या आर्थिक वर्षात योग्य ती पुर्तता करुन हे केंद्र सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. आतापर्यंत ६१९ रुग्णांना दंतसेवा देण्यात आली आहे.