लातूर : एजाज शेख
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात आहे. दि. १६ डिसेंबर रोजी धर्मवीर राजे प्रतिष्ठान उदगीरच्या वतीने एम. जी. राठोड लिखीत व पुजा राठोड दिग्दर्शित ‘गावगुंड शेवटी झाला थंड’ या दोनअंकी नाटकाचा प्रयोग झाला. या नाटकातून स्वच्छतेचा जागर मांडण्यात आला.
स्वच्छता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन व परिसर स्वच्छ ठेवणे. या नाटकामध्ये गावातील अनाडी माणसं एकत्र येऊन गाव स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि पुढारी सहकार्य करीत असतात. परंतू, काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांना त्रास होत असतो. परंतू, त्यांचे गाव स्वच्छतेचे काम पाहूण गावगुंड शेवटी थंड होऊन त्यांना सहकार्य करतात, असा स्वच्छतेचा जागर या नाटकाने मांडला.
नाटकाच्या सादरीकरणासाठी आवश्यक असणा-या कुठल्याही आधुनिक तंत्राचा वापर न करता पारंपारीक वाद्य संवादीनी व ढोलकीच्या तालावर नाटकाचा पडदा उघडतो. नाटकातील सर्वच्या सर्व पात्र रंगमंचावर येतात. गणेशाची आरधाना करतात आणि स्वच्छतेच्या जागराला सुरुवात होते. या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे, स्त्री पात्र पुरुषांनीच केली. नाटकामध्ये नाट्य कमी आणि वग जास्त होते. सखाराम (ईश्वर इंगळे), प्रधान (बाळासाहेब कटारे), दवडीवाला (प्रमोद जोगदंड), मावशी (गोट्या दबाणे), कृष्णा (दीपक वासूदेव), राजा (सुरेश बनसोडे), ईश्वर (शरद इंगळे), दगडू (तानाजी वाघमारे), प्रभू (अमित इंगळे) यांच्यासह सहायक कलावंत म्हणुन महेश राठोड, शारदा चव्हाण, तुषार राठोड, भाग्यश्री वाकसे, प्रभाकर आगळे, रुपाली वाकसे यांनी भुमिका बजावल्या. व्यंकटेश कदम व प्रवीण कदम यांचे संगीत होते. या नाटकात तांत्रिकदृष्ट्या काहींच नसले तरी या नाटकाने स्वच्छतेचा जागर मांडला तो पारंपारीक पद्धतीने.