39.6 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeअंतरराष्ट्रीय‘नाटो’च्या हद्दीत रशियाची घुसखोरी; ‘टायफून’ने रोखले

‘नाटो’च्या हद्दीत रशियाची घुसखोरी; ‘टायफून’ने रोखले

लंडन : वृत्तसंस्था
रशियाच्या लढाऊ विमानांनी नाटोच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केली होती. यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. रशियाच्या लढाऊ विमानांना माघारी पाठविण्यासाठी ब्रिटनच्या ‘टायफून’ लढाऊ विमानांनी हवेत झेप घेतली आणि रशियन विमानांना माघारी पाठविण्यात ही विमाने यशस्वी ठरली.

रशिया कोणत्याही क्षणी युरोपवर हल्ला करेल अशी भीती तेथील देशांना वाटत आहे. यामुळे या देशांनी लष्करी सामुग्री वाढविण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटनने आपली लढाऊ विमाने पोलंडमध्ये तैनात केली आहेत. बाल्टिक समुद्रावर रशियाने ही घुसखोरी केली. या विमानांनी एका आठवड्यात तीन वेळा उड्डाण केले आहे. रशियाचे टेहळणी विमान आणि लढाऊ विमाने नाटोच्या क्षेत्रात उड्डाण करताना दिसल्याचे सांगितले जात आहे.

ब्रिटन नाटोच्या पाठीशी उभा आहे. रशियाच्या धोक्यापासून मित्र राष्ट्रांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. नाटोचा नवा सदस्य स्वीडनसोबत मिळून आम्ही काम करू शकतो हे नव्या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे, असे ब्रिटनचे सशस्त्र दल मंत्री ल्यूक पोलार्ड यांनी सांगितले.

ब्रिटिश आणि रशियन विमाने समोरासमोर आल्याने या भागात तणाव वाढण्याची शक्यता आहे. पोलंडमधील हवाई तळावर सहा टायफून विमाने तैनात आहेत, यांच्यासोबत स्वीडनची विमानेही आहेत. अमेरिकेने युक्रेनवरून हात काढले असले तरी युरोप युक्रेनच्या बाजुने उभा आहे. फ्रान्सने देखील युद्धाची तयारी करण्यास सुरुवात केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR