24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूरनाट्य चळवळ सक्षम करण्यात श्रीराम गोजमगुंडे यांचे मोठे योगदान 

नाट्य चळवळ सक्षम करण्यात श्रीराम गोजमगुंडे यांचे मोठे योगदान 

लातूर : प्रतिनिधी
लातूरची नाट्य चळवळ सक्षम करण्यात नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. त्यांना विक्रम गोजमगुंडे यांचे सहकार्य मिळाले. गोजमगुंडे यांची नाट्य चळवळ आता त्यांची नवी पिढी अविष्कार गोजमगुंडे, विक्रांत गोजमगुंडे पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.
रसबहार, संस्थेच्या वतीने दि. २३ जून रोजी सायंकाळी ७ वाजता येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती भवनात वि. वा. शिरवाडकर लिखीत व कल्याण वाघमारे दिग्दर्शित ‘नटसम्राट’ या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग झाला. या प्रयोगाचा शुभारंभ माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी नाट्यकलावंताना शुभच्छा देताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, नाट्य लेखक व दिग्दर्शक बाळकृष्ण धायगुडे, संतोष देशमुख, डॉ. शिरोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘नटसम्राट’ या सद्य:स्थितीचे वास्तविक चित्रण करणा-या नाटकाने नेहमीच नाटरसिकांना खेळवून ठेवले आहे. रविवारीही तेच झाले. नव्या दमाचा नाटयकलावंत अविष्कार गोजमगुुंडे यांने गणपतराव बेलवणकर ही मुख्य व्यक्तीरेखा पुर्ण ताकदीने उभी केली. कावेरीची भुमिका अर्पणा गोवंडे यांनी साकारली. दोघांनीही तोलामुलाची भुमिका पार पाडली. विक्रांत गोजमगुंडे, भावना गोजमगुंडे, कौस्तुभ जोशी, डॉ. भाग्यश्री कुलकर्णी, प्रा. जोतिबा बडे, ईश्वरी वाघमारे, सुरेखा मदने, राजीव गड्डीमे, अ‍ॅड. हंसराज साळुंके, सुरेंद्र अपसिंगेकर, प्रीती ठाकूर, सुधीर बिर्ले, रोहित साळवे, अजय कातपुरे, आकुस्कर गुरुजी यांनी आपापल्या भूमिकांना न्याय देण्याचा चांगला प्रयत्न केला.
 विशाल गोजमगुंडे, रोहिणी गोजमगुंडे, कविता लंजिले निर्मित या दोन अंकी नाटकाला दयानंद सरपाळे यांचे पार्श्व संगीत नाटकाची उंची आणखी वाढविणारे होते. सुधीर राजहंस, गणपत कुलकर्णी यांची प्रकाश योजना नाटकाला साजेशी होती. डॉ. भक्ती गोजमगुंडे, रुपाली हरिदास यांची वेशभूषा होती. भारत थोरात यांची रंगभूषा तर विवेक मगर, नागनाथ पांचाळ यांचे नेपथ्य होते. या नाटकाच्या प्रयोगाला लातूर शहर व परिसरातील नाट्यरसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. नाटय स्पर्धा असों, नाटक प्रायोगीक असो की व्यवसायिक लातूरच्या नाट्य रसिकांकडून नेहमीच भरभरुन प्रतिसाद मिळतो. ‘नटसम्राट’च्या नाट्य प्रयोगालाही मोठा प्रतिसाद मिळाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR