लातूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या वतीने नाटयक्षेत्रातील विविध पुरस्कार देण्यात येतात. यापैकी यंदाचा वि. स. खांडेकर नाटय समीक्षक पुरस्कार लातूर मधील मुक्त पञकार तथा लातूर नाट्य परिषदेच्या महानगर शाखेचे कोषाध्यक्ष, नाट्य समिक्षक अनिल पुरी यांना जाहीर झाला आहे.
गेली अनेक वर्षे अनिल पुरी हे नाट्यसमीक्षक म्हणून विविध वर्तमानपत्र तथा सोशल मिडियावर लिखाण करत असतात. राज्यनाट्य स्पर्धा, कामगार नाट्यस्पर्धा, महावितरण नाट्यस्पर्धा, परिवहन नाट्यस्पर्धा, नाट्य संमेलन, एकांकिका स्पर्धा या व याशिवाय लातूरमधील नाट्यविषयक होणा-या सर्व उपक्रमात ते समीक्षक म्हणून अग्रेसर असतात. नाट्य परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच हा पुरस्कार अनिल पुरी यांच्या माध्यमातून मराठवाड्यात मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवार दि. १४ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता यशवंतराव नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले व नाट्य क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे .लातूरच्या मातीतल्या समीक्षकाला मिळालेल्या या पुरस्कारामुळे लातूरच्या नाट्य चळवळीचे महत्त्व महाराष्ट्र पातळीवर अधोरेखित झाले आहे. त्यांचा लातूरकरांना अभिमान असल्याची भावना लातूर महानगर शाखेचे अध्यक्ष अँड. शैलेश गोजमगुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.
या पुरस्काराबद्दल प्रा. गिरीश सहदेव, प्रदीप पाटील खंडापूरकर, बाळकृष्ण धायगुडे, प्रा. डॉ. दिपक वेदपाठक, नाट्यस्पंदनचे डॉ. अशोक आरदवाड, डॉ. मुकुंद भिसे, लातूर शाखेचे कार्यवाह धनंजय बेंबडे, मयूर बनसोडे, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सुमती सोमवंशी, कार्याध्यक्ष मयूर राजापुरे, प्रमुख कार्यवाह प्रा. नवलाजी जाधव, नाट्यनिर्माते राजन अयाचित आदींनी अनिल पुरी यांचे कौतुक केले आहे.
………………………१०……………………….