ग्रेटर नोएडा : अफगाणिस्तान-न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना पाचव्या दिवशीही होऊ शकला नाही. ग्रेटर नोएडा येथे ९ ते १३ सप्टेंबर दरम्यानचा हा सामना रद्द करण्यात आला. सततचा पाऊस आणि ओले मैदान, ड्रेनेजची असुविधा तसेच स्टेडियमवरील व्यवस्थापनातील उणीवा यामुळे सामना रद्द करावा लागला. मैदान आणि खेळपट्टी झाकण्यासाठी कार्पेट आणि पंखे देखील भाड्याने आणावे लागले. एकही चेंडूचा खेळ न होता पाच दिवसांचा कसोटी सामना रद्द होण्याची भारतातील ही पहिलीच वेळ ठरली.
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये खेळला न गेलेला ऐतिहासिक एकमेव कसोटी सामना ९१ वर्षातील भारतातील पहिला कसोटी सामना आहे. भारताने १९३३ मध्ये प्रथम मुंबई (जिमखाना मैदान) येथे कसोटी सामन्याचे आयोजन केले होते. तेव्हापासून भारतात झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच असे घडले, की एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द करण्यात आला.
आशिया खंडाबाबत बोलायचे तर डिसेंबर १९९८ मध्ये फैसलाबादमधील एक कसोटी सामना धुक्यामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता. हा कसोटी सामना पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात होता. पण ग्रेटर नोएडामध्ये सतत पडणारा पाऊस हे कसोटी सामना न होण्याचे एक कारण होते. दुसरीकडे, खराब ड्रेनेज व्यवस्था आणि संसाधनांचा अभाव यामुळे देखील पेच निर्माण झाला. ग्राउंड स्टाफ देखील मुसळधार पावसापासून संरक्षण करण्यासाठी संपूर्ण मैदान झाकण्यात अपयशी ठरला.
तसेच, नाणेफेक आणि चेंडू टाकल्याशिवाय कसोटी सामना रद्द होण्याची ही २६ वर्षांतील पहिलीच वेळ आहे. १९९८ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कॅरिसब्रुक, ड्युनेडिन येथे झालेल्या क्रिकेट सामन्यात असे घडले होते.
चौकट
१८९० पासून ७ वेळा घडला असा प्रकार…
ऑगस्ट १८९० – ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड
जुलै १९३८ – ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड
डिसेंबर १९७० – ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड
फेब्रुवारी १९८९ – पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड
मार्च १९९० – वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लंड
डिसेंबर १९९८ – पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड
डिसेंबर १९९८ – भारत विरूद्ध न्यूझीलंड
सप्टेंबर २०२४ – अफगाणिस्तान वि. न्यूझीलंड