अकलूज, –
माळशिरस तालुक्यातील नातेपुतेच्या बाजारपेठेतील वृषभराज ज्वेलर्स दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे १४ लाख २० हजार रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने लंपास केले आहेत. दरम्यान, पोलिसांची विविध पथके चोरट्यांच्या मागावर रवाना झाली आहेत.
नाते पुते – वालचंदनगर रोडवरील मुख्य बाजारपेठेतील राजेश चंद्रशेखर चंकेश्वरा यांचे राहते घर आणि दुकान आहे. या ठिकाणी वृषभराज राजेश चंकेश्वरा यांचे ज्वेलरी दुकान आहे. मध्यरात्री शटर उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. दुकानात जाईपर्यंतचे चार दरवाजे चोरट्याने उघडले. दुकानातील मुख्य दरवाजाची चावी त्यांना या ठिकाणीच मिळून आली. दुकानातील सुमारे पैंजण, जोडवे असे १५ ते १६ किलो चांदीचे दागिने तसेच ३०० ते ३५० ग्रॅम सोने चोरट्यांनी लंपास केले. हे करीत असताना नकली सोन्याच्या दागिन्यांना चोरट्यांनी स्पर्शही केला नाही. म्हणजेच ही चोरी अट्टल गुन्हेगारांकडून घडलेली दिसून येते.
तसेच या चोरीत गावातील माहीतगार इसमाचा समावेश असावा असा पोलिसांचा कयास आहे. पैंजण आणि जोडवी नेण्यासाठी दुकानाच्या मागील बाजूस भुशाचे पोते रिकामे करून या पोत्यात दागिने नेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. सकाळी सातनंतर दुकान मालक हे बेडरूममधून खाली आल्यानंतर शटर उचकटल्याचे त्यांना दिसून आले. तेव्हा चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी दुकानातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायरी तोडल्या आहेत. तसेच कॅमेऱ्याचा डिव्हाईस चोरट्याने चोरून नेला आहे. त्यामुळेच कोणताही पुरावा त्यांनी मागे ठेवलेला नाही.
घटना समजताच नातेपुते पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच फौजदार विक्रांत ढिगे यांनी व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवणे सुरू केले असून सोलापूरवरून श्वान पथक मागविण्यात आले होते. नातेपुते शहरातील मागील दोन- तीन वर्षातील एकाही चोरीचा तपास पोलीस खात्याकडून लागलेला नाही. पोलिसांच्या निष्क्रिय कारभाराबद्दल गावातील सर्वस्तरातून नाराजीची भावना दिसून येते. घटनास्थळी आमदार राम सातपुते यांनी भेट देऊन पोलीस खात्यातील वरिष्ठांना या चोरीचा तपास तातडीने लावण्यास सांगितले.