मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या कठोर प्रोफेशनलिज्म आणि पंक्चुएलिटीसाठी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहेत. चित्रपटाचे शूटिंग असो, बैठक असो किंवा सार्वजनिक कार्यक्रम ते नेहमीच वेळेवर पोहोचण्याला प्राधान्य देत असतात. बुधवारी ‘ओ रोमियो’च्या ट्रेलर लॉन्चला देखील त्यांनी ही पद्धत पाळली, मात्र अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी हे उशिरा आल्याने नाना पाटेकर संतापत कार्यक्रमातून निघून गेले.
ज्येष्ठ अभिनेता दुपारी १२ वाजता एका मल्टिप्लेक्समध्ये आयोजित असलेल्या ‘ओ रोमियो’च्या ट्रेलर लॉन्चमध्ये टाईमवर उपस्थित होतो. मात्र कार्यक्रमास उशीर होत असल्याचे पाहून नाना पाटेकर संतापले. कार्यक्रमाच्या आयोजकांनी त्यांना थांबवण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला.
व्हीडीओमध्ये नाना त्यांच्या घड्याळाकडे रागाने बोट दाखवत, आयोजकांशी काहीतरी बोलताना दिसत आहेत, जणू काही ठरलेल्या वेळेचा आदर केला गेला नाही, असे या व्हीडीओवरून सिद्ध होते आहे. नानांच्या जाण्यानंतर, दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी ट्रेलर लाँच कार्यक्रमात उघडपणे खुलासा केला की कार्यक्रम उशिरा सुरू झाल्याने नाना संतापले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांच्या मते, चित्रपटाचे दोन मुख्य कलाकार, शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी, नाना गेल्यानंतर दुपारी १:३० च्या सुमारास कार्यक्रमस्थळी पोहोचले.
चित्रपटात शाहिद कपूर एका क्रूर गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय चित्रपटामध्ये तृप्ती डिमरी आणि नाना पाटेकर यांच्या व्यतिरिक्त, अविनाश तिवारी, दिशा पटानी, फरीदा जलाल, अरुणा इराणी आणि विक्रांत मेस्सी यांच्याही विशेष भूमिका आहेत. तसेच तमन्ना भाटिया देखील चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. साजिद नाडियादवाला निर्मित ‘ओ रोमियो’ १३ फेब्रुवारी २०२६ रोजी व्हॅलेंटाईन डे दरम्यान थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

