22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरनान्नजच्या शाळेतील'त्या' तेरा शिक्षकांचा नोटीसवर खुलासा

नान्नजच्या शाळेतील’त्या’ तेरा शिक्षकांचा नोटीसवर खुलासा

सोलापूर : प्रश्नपत्रिकेतील उत्तरे चुकली असतानाही गुण देणाऱ्या, गावकरी व वरिष्ठ शाळेची स्वच्छता करीत असताना सहभागी न झालेल्या तसेच सीईओ, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी शाळेवर आले असताना शाळा बंद ठेवलेल्या नान्नजच्या १३ शिक्षकांनी नोटीसचा खुलासा सादर केला आहे. ‘आम्ही चूक तर केली आहेच, सुधारण्याची संधी द्यावी, एकवेळ माफ करण्याची विनंती शिक्षकांनी केली असल्याचे सांगण्यात आले.

झेड. पी. सीईओ मनीषा आव्हाळे यांनी १ मे रोजी नान्नज येथील झेड.पी. शाळेची झाडाझडती घेतली होती. मतदान केंद्र स्वच्छतेसाठी आलेल्या सीईओंना शाळेतील विदारक चित्र पाहायला मिळाल्याने त्यांनी तपासणी केली होती. इयत्ता दुसरीच्या वर्गातील पेपरमधील उत्तरे चुकली असताना गुण मात्र दिल्याचे आढळले होते. शाळा परिसरातील घाण गावकरी, बीडीओ व इतर कर्मचारी काढत असताना शिक्षकांनी सहभाग घेतला नव्हता. ही बाब सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले.

२ मे रोजी सीईओ, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख व इतर अधिकाऱ्यांना सोबत घेत शाळेवर गेल्या असता शाळा बंद आढळली. या सर्व प्रकारानंतर शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सर्वच १३ शिक्षकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्या नोटीसवर सर्वच १३ शिक्षकांनी खुलासा सादर केला आहे. शिक्षकांनी खुलाशात चूक मान्य करीत सुधारण्याची संधी द्यावी, असे म्हटले आहे.

नोटीसमध्ये विचारलेल्या प्रत्येक मुद्यावर सुधारणा करण्यात येईल व माफ करावे, असे उत्तर दिले असल्याचे सांगण्यात आले.उत्तर सोलापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने शिक्षकांचे खुलासे प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाला सादर केले असून, आता पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. स्वतः सीईओ व शिक्षणाधिकारी शाळेवर आल्यानंतर शिक्षक गैरहजर होते. शिवाय गंभीर बाबी आढळल्याने शिक्षकांवर कारवाई होणारच असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR