लातूर : प्रतिनिधी
जिल्हयातील पिकांना अतिवृष्टीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतर शेतक-यांच्या उरल्या सुरल्या अशा आडत बाजारात सोयाबीन विक्रीसाठी गेल्यानंतर निराशेत बदलत आहेत. शासनाने सोयाबीनला ५ हजार ३२८ रूपये हमीभाव जाहिर केला असता आडत बाजारात ४ हजार ७०० रूपयांच्या आसपास सोयाबीनला दर मिळत आसून सोयाबीनला क्विंटल मागे ७०० ते ८०० रूपयांचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी शासनाच्या नाफेकडे सोयाबीन विक्रीसाठी वळत आहेत. तिथे नोंदणी करूनही १५ हमीभाव केंद्रावर सोयाबीनची खरेदी संथ गतीने सुरू आहे.
लातूर जिल्हयात यावर्षी ५ लाख ९१ हजार ६६५ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या. या मध्ये ४ लाख ८७ हजार ६६३ हेक्टरवर सोयाबीनचा सर्वाधीक पेरा झाला आहे. तसेच तूर ७० हजार ६६९ हेक्टर, मूग ७ हजार २२६ हेक्टर, उडीद ६ हजार १८६ हेक्टर, ज्वारी २ हजार ८४९ हेक्टर, बाजरी ९३ हेक्टर, मका २ हजार १२३ हेक्टरवर पेरणी झाली होती. सोयाबीन काढणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे मोठया प्रमाणात सोयाबीन भिजले. कांही तर शेतक-यांच्या डोळया देखत सोयाबीनचे ढिगारे नदीच्या पाण्याच्या प्र्रवाह बरोबर वाहत गेले. राहिलेले सोयाबीन शेतकरी आडत बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. सोयाबीनला शासनाने ५ हजार ३२८ रूपये हमीभाव जाहिर केला असला तरी आडत बाजारात सोयाबीनला ४ हजार ७०० रूपयांच्या जवळपास भाव मिळत आहे. यामुळे शेतक-यांच्या सोयाबीनला क्विंटल मागे ७०० ते ८०० रूपयांचा जवळपास फटका बसत आहे. सदर बाब पाहता शेतकरी शासनाने सुरू केलेल्या हमीभाव खरेदी केंद्राकडे नोंदणी करण्यासाठी वळत आहेत.
नाफेड कडून जिल्हयात ३० ऑक्टोबर पासून १५ सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहेत. लातूर, सेलू, औसा, चाकूर, आष्टा, रेणापूर, उदगीर, देवणी, अहमदपूर, सताळा, शिरूर ताजबंद, हलसी, साकोळ, कुनकी या खरेदी केंद्रावर आजपर्यंत २८ हजार ५९० शेतक-यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३ हजार ४१४ शेतक-यांना सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येण्यासाठी एसएमएस पाठवण्यात आले आहेत. जिल्हयातील १ हजार ६८ शेतक-यांचे २३ हजार २०४ क्विंटल सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी केले आहे.

