परभणी : खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन शेतकरी घेतात. य्शासनाने नाफेड मार्फत खरेदी सुरु केली. जिल्ह्यातील शेतक-यांनी ऑन लाईन नोदणी केली. परंतु खरेदी मात्र संथ गतीने सुरु आहे.
यातच केंद्र सुरु झाल्या पासुन बारदाना नाही म्हणुन जवळ पास २० ते २५ दिवस खरेदी बंद राहिली. याचा फटका सोयाबीन उत्पादक शेतक-यांना बसला. ६ फेब्रुवारी पासुन सरकारने खरेदी बंद करण्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या ५१७६ शेतक-यांचे सोयाबीन खरेदी अद्यापही झालेली नाही. त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी २० ते २५ दिवस वाढवण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुदत वाढवून दिल्यास बारदाना अभावी बंद राहिलेले दिवस भरून निघतील आणि नोंद झालेल्या ५१७६ शेतक-यांचे सोयाबीन खरेदी होईल. मुदत वाढवून न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना संपुर्ण जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन छेडेल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, हनुमान चांगभले, माऊली शिंदे, प्रसाद गरुड, मुंजाभाऊ लोडे, सुदाम ढगे, पंडित भोसले, सय्यद कलीम भाई, सुशील रसाळ, नामदेव शिंदे यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते