अहिल्यानगर : प्रतिनिधी
गणेशोत्सव, नवरात्री आणि येणा-या दसरा, दिवाळी सणामुळं बाजारात नारळाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून नारळाचं उत्पन्न कमी असल्यानं नारळांचा पुरवठाही कमी झाला आहे. त्यामुळं घाऊक बाजारात दरामध्ये वाढ झाली आहे. ठोक बाजारात नारळाचे भाव हे २९०० ते ३००० रुपये शेकडा आहे. तर दिवाळीपर्यंत ही मागणी कायम राहणार असल्याचे घाऊक व्यापा-यांनी सांगितले.
प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये नारळ हे आवश्यक असते. त्यामुळं यंदा नारळामुळं ग्राहकाच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान हे भाव २० ते २५ वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं घाऊक व्यापा-यांनी सांगितलं. तर कधीकाळी १५ ते २० रुपयाला मिळणारा नारळ आज ३५ ते ४० रुपये किंमतीने घ्यावा लागत असल्यानं काही प्रमाणात नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. परंतु, धार्मिक कार्यात नारळाला महत्त्व असल्यानं खरेदी करावे लागते असं यावेळी ग्राहकांनी सांगितलं. महाराष्ट्रात आंध्र प्रदेश, कर्नाटक, मद्रास, तमिळनाडू या राज्यातून प्रामुख्याने नव्या नारळाची आवक होत असते.
खोब-याच्या भावात वाढ
यंदा खराब हवामान, नारळाच्या झाडांवर वारंवार पडणारी रोगराई, यामुळे नारळाचे उत्पादन कमी झालं आहे. नाराळा बरोबरच खोब-याच्या भावात देखील वाढ झाली आहे. ठोक दुकानांमध्ये ३६० ते ३८० किलो दराने खोब-याची विक्री होत आहे. त्यामुळं सध्यातरी नारळ विक्रेत्यांसह खरेदीदारांकडे कुठलेही दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने नागरिकांना आगामी सर्वच सणांना नारळ हे चढ्या दरानेच खरेदी करावे लागण्याची शक्यता आहे.