मुंबई : प्रतिनिधी
महायुतीमधील पालकमंत्री पदावरुन वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नसल्याचे दिसत आहे. तसेच पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. याचदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन दरे गावाला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरे गावात रवाना झाले आहेत. वैयक्तीक कारणासाठी चार दिवस दरे गावी रवाना झाल्याचे बोलले जात आहे. मात्र पालकमंत्रिपद वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी हेलिकॉप्टरने दरे गावाला जाणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौ-यावर आहेत. चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन एकनाथ शिंदे यांची भेट घेत पालकमंत्रिपदावरुन चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तिघांमध्ये नेमकी कोणती चर्चा होणार?, भेटीत कोणता तोडगा निघणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.