लातूर : प्रतिनिधी
शहरात गेल्या दोन वर्षापासून नारायणा ई-टेक्नो स्कूल ही शाळा शिक्षण विभागाची कसलीही मान्यता नसतानाही सुरु आहे. अनेकवेळा निवेदने देवून व आंदोलन करुनही शिक्षण विभाग व पोलीस प्रशासन या शाळेवर काहीही कार्यवाही करायला तयार नाही. त्यामुळे मनसे विध्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण व त्यांचे सहकारी यांच्याकडून खळ्ळखट्याक आंदोलन करण्यात आहे.
या शाळेकडून लातूर जिल्ह्यातील पालक व विद्यार्थ्यांची दिशाभूल करुन प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ७५ हजार ते एक लाख रुपये फीस आकारून अॅडमिशन घेणे सध्या जोरात सुरु आहे. मनसेच्या निवेदनावरुन शिक्षण विभागाने या शाळेला भेट देऊन चौकशी केली असता ही शाळा शासनाची कसलीही मान्यता नसतानाही सुरु असल्याचे शिक्षण विभागाच्याही निदर्शनास आले आहे. शिक्षण विभागाने दि.१० जानेवारी २०२५ रोजी सदरील शाळेला अनधिकृतपणे सुरु असून ती तात्काळ बंद करावी तसेच शाळेत नवीन प्रवेश घेऊ नयेत व ज्या विद्यार्थ्यांचे या शाळेत प्रवेश घेतले गेले आहेत त्यांना जवळच्या शाळेत स्थलांतरित करावे, असे सक्त आदेश देऊन शाळेत दंड ठोठावला होता. तरीही या शाळेच्या शाळा व्यवस्थापनाने ही शाळा सुरुच ठेवली व नवीन प्रवेश प्रक्रियाही सुरू ठेवली.
त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि. ४ एप्रिल रोजी शिक्षण उपसंचालक लातूर, शिक्षण अधिकारी लातूर यांना निवेदन देऊन नारायणा ई-टेक्नो स्कूल या शाळेत कुलूप ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले होते. शिक्षणाधिकारी लातूर यांनी नारायण ई टेक्नो स्कूल ही शाळा अनधिकृत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे पत्र शिवाजीनगर पोलीस ठाण्याता दि. दि. १५ एप्रिल रोजी दिले होते. परंतु शिवाजीनगर पोलिसांनी शाळेवर काय गुन्हा दाखल करायचा आहे. या संदर्भात शिक्षण विभागाला तसेच वरिष्ठाला विचारले पाहिजे, असे कारण सांगत अद्यापपर्यंत शाळेवर गुन्हा दाखल केला नाही. प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षाचा गैरफायदा घेत अद्यापपर्यंत ही शाळा सुरुच आहे व त्यांची प्रवेश प्रक्रिया ही सुरु आहे. तसेच फीसरुपी वसुलीही सुरु आहे. हे सर्व रोखण्यास कोणतेही प्रशासन तयार नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे.