– ‘जीविका दीदी’, दारूबंदीमुळे महिलांचा एकतर्फी पाठिंबा
– यादवांना भाऊबंदकी भोवली; महिला योजना ‘एनडीए’च्या पथ्यावर!
पाटणा : वृत्तसंस्था
लालू प्रसाद यादवांच्या भावकीतील वाद आणि नितीशकुमार यांच्या महिलांसाठीच्या योजना यामुळे ‘एनडीए’ने घवघवीत यश संपादन केल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये ‘एनडीए’ने जोरदार आघाडी घेतली असून, या अभूतपूर्व यशामागे महिला मतदारांची निर्णायक भूमिका राहिली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दारूबंदी आणि ‘जीविका दीदी’ योजनांमुळे महिला मतदारांनी ‘एनडीए’ला एकतर्फी पाठिंबा दिल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
एकूण मतदानापैकी पुरुषांपेक्षा सुमारे १०% अधिक मतदान महिलांनी केले होते. महिला मतदान : ७१.६%, पुरुष मतदान : ६२.८% अशी टक्केवारी होती. यंदाच्या निवडणुकीत महिलांनी विक्रमी मतदान केले. पुरुषांच्या तुलनेत या ‘नारी शक्ती’ने बिहारच्या राजकारणाचा संपूर्ण चेहरा बदलला आहे.
दारूबंदीचा निर्णय गेमचेंजर ….
नितीश कुमार यांनी बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्याचा घेतलेला निर्णय महिलांसाठी सर्वात महत्त्वाचा ठरला. दारूमुळे होणारा कौटुंबिक त्रास, आर्थिक नुकसान आणि हिंसाचार थांबल्यामुळे महिलावर्गाने मोठ्या संख्येने नितीश कुमारांच्या बाजूने मतदान केले. हा निर्णय महिला मतदारांमध्ये नितीश कुमारांच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण ठरला.
‘जीविका दीदी’ योजनेची जादू…..
निवडणुकीपूर्वी नितीश सरकारने ‘जीविका दीदी’ योजनेअंतर्गत सुमारे १.३० कोटी महिलांना प्रत्येकी १० हजार रुपये दिले होते. स्वयंसहाय्यता समूहांना बळ देणा-या या योजनेने थेट महिलांच्या हातात पैसा दिला. या आर्थिक पाठिंब्यामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये सरकारबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले, ज्याचा फायदा ‘एनडीए’ला झाला.
जुन्या योजनांची भक्कम साथ…..
२००६ मध्ये सुरू केलेली ‘मुख्यमंत्री बालिका सायकल योजना’ आणि शालेय गणवेश योजना यांसारख्या जुन्या योजनांनी देखील महिलांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. या दीर्घकालीन योजनांमुळे नितीश कुमारांची प्रतिमा महिलांच्या प्रगतीसाठी काम करणारा नेता अशी कायम राहिली.
‘एनडीए’ला कसा फायदा झाला?
नितीश कुमारांचा सुशासन फॅक्टर : महिलांना मोफत बस प्रवास, पंचायतींमध्ये ५०% आरक्षण, दारूबंदी, गुन्हेगारी कमी, रस्ते-वीज-पाणी योजनांमुळे महिला आणि ‘ईबीसी’ मतदार मोठ्या संख्येने ‘एनडीए’कडे वळाले आणि नितीशकुमारांना विकास पुरुष म्हणून क्रेडिट मिळाले.
मोदींचा प्रचार, राष्ट्रीय इमेज : मोदींनी २० हून अधिक सभा घेतल्या. डबल इंजिन सरकार, केंद्राच्या योजनांचा (आवास, उज्ज्वला, आयुष्मान भारत) फायदा, जंगलराज परत येईल असा ‘राजद’वर हल्ला. मोदींची लोकप्रियता+नितीश कुमारांचा स्थानिक चेहरा = परफेक्ट कॉम्बिनेशन. जनतेला स्थैर्य हवे होते.
महाआघाडीचा विजय रथ कुठे रूतला!
राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप जनतेला पटला नाही. बेरोजगारी आणि १० लाख नोक-यांचे आश्वासन २०२० मध्ये खूप चालले होते, पण २०२५ मध्ये लोकांना वाटले की ‘एनडीए’च्या २० वर्षांच्या सत्तेत काही सुधारणा झाल्या (महिला सक्षमीकरण, रस्ते, वीज, पाणी). तेजस्वींचे ‘एक कुटुंब-एक नोकरी’ हे आश्वासन अवास्तविक वाटले.
जातनिहाय जनगणना, आरक्षण वाढ : बिहार सरकारने आधीच जात जनगणना केली होती आणि ‘एनडीए’नेही त्याचा फायदा घेतला. केंद्रातही जात जनगणना होईल असे मोदींनी सांगितले, त्यामुळे हा मुद्दा ‘विशेष’ राहिला नाही. ईबीसी-ओबीसी मतदार ‘एनडीए’कडे राहिले.
अग्निवीर योजना, युवा असंतोष : अग्निवीरवर टीका केली, पण मोदींच्या प्रचारात राष्ट्रीय सुरक्षा आणि सैन्यात बिहारी युवकांना संधी असे सांगितले गेले. युवा मतदारांचा काही भाग ‘एनडीए’कडे गेला.
स्थलांतर (मायग्रेशन) : दोन्ही बाजूंनी हा मुद्दा उचलला, पण ‘एनडीए’ने गेल्या जंगलराजात शिक्षण-रोजगार नव्हते, आता सुधार झाला, असे सांगितले.
महाआघाडीमध्ये अंतर्गत मतभेद : राजद-काँग्रेस-डावे यांच्यात समन्वय कमी, काही जागांवर उमेदवारांच्या निवडीत गोंधळ झाला.

