नाशिक : प्रतिनिधी
मराठी विरुद्ध कन्नड या वादावरून आता पुन्हा एकदा राजकारण पेटले आहे. कोल्हापुरात त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने कर्नाटकातील बसेस रोखल्या होत्या. तर नाशकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत कर्नाटक बसला काळे फासून कन्नडीगांना जशास तसे उत्तर दिले आहे.
दरम्यान, बेळगाव येथे कन्नड वेदिका रक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाला काळे फासले होते. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. अशाच प्रकारे मनसेने उत्तर देण्याचे ठरविल्यास कन्नड भाषिकांना ते महागात पडेल. यापुढे असा प्रकार घडल्यास तीव्र आंदोलन होईल. मनसे स्टाईलने होणारे हे आंदोलन कन्नड वेदिका संघटनेला झेपणार नाही, असा इशारा शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी दिला.
यावेळी नाशिक मध्यवर्ती बस स्थानकावर आलेल्या कर्नाटकाच्या बसेसला काळे फासण्यात आले. त्यावर ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत कर्नाटक सरकार आणि कन्नड वेदिका संघटनेचा निषेध केला.