नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात बुधवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यासह त्यांच्या भावाचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी चौकशीला वेग दिला आहे.
हत्या झालेल्या दोघांची नावे उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी आहेत. बुधवारी रात्री ११:३० वाजता पुणे-नाशिक महामार्गालगतच्या आंबेडकरवाडी परिसरात ही घटना घडली. दोन्ही भाऊ सार्वजनिक शौचालयाजवळून जात असताना अज्ञात टोळक्याने दबा धरून त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
हल्लेखोरांनी धारदार कोयत्याने डोक्यावर, पाठीवर, पोटावर, हातावर आणि चेह-यावर वार केले. यामध्ये एका भावाचे मनगट तुटले आहे. अत्यंत अमानुषपणे झालेल्या हल्ल्यात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही युवकांनी तातडीने जखमींना शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
मृत उमेश जाधव हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष होते. राजकीय कनेक्शन असलेल्या पदाधिका-याची अशी हत्या झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.