नाशिक : नाशिक जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाईन पोर्टलवर बाधित शेतक-यांचे नाव, त्यांच्या बँकेचा खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर माहिती अपलोड करण्यात आली. तर जवळपास ५२ हजार ७८२ शेतक-यांनी ही माहिती अपलोड केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या शेतक-यांना मिळणारी नुकसानभरपाईची शासकीय मदत आता परत जाण्याची शक्यता आहे.
राज्य शासनामार्फत नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ ते जानेवारी २०२४ या कालावधीत तसेच खरीप २०२३ कालावधीत झालेल्या पिके आणि फळपिकांच्या नुकसानीबाबत शासनामार्फत ई-पंचनामा या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केलेल्या बाधित शेतक-यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यात खरीप हंगाम २०२३ मध्ये १७ हजार ९५० बाधित शेतक-यांची माहिती अपलोड करण्यात आली. तसेच नंतरच्या काळात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या जवळपास ३४ हजार ८३२ शेतक-यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.
ज्या शेतक-यांनी ई-केवायसी तसेच बँक खाते, आधार कार्डसोबत संलग्न केले आहे, त्या शेतक-यांच्या बँक खात्यावर शासनामार्फत नुकसानीची रक्कम जमा करण्यात आली आहे. तर ज्या शेतक-यांनी प्रमाणीकरण केले नाही, त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. जर ही माहिती अपलोड केली नाही, तर त्यांना शासकीय मदत मिळणार नसल्याचेही जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले आहे.