29.2 C
Latur
Monday, April 14, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये तडीपार गुंडाकडून महिलेचा विनयभंग

नाशिकमध्ये तडीपार गुंडाकडून महिलेचा विनयभंग

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. रिक्षाचालकाने भररस्त्यात नग्न होत अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून तो शहरातून तडीपार असल्याची माहिती समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित रिक्षाचालक मिजान रजा ऊर्फ मल्ला सादिक शेख याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोधले नगर परिसरातून सिटीलिंकची बस येताना ती अचानक बंद पडली. यामुळे बसमधील प्रवासी दुस-या बसची वाट पाहत खाली उतरले. त्यावेळी एक रिक्षाचालक प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी विचारणा करण्यासाठी आला होता. त्याने फिर्यादी महिलेला विचारले की, तुमको किधर जाना है, यावेळी महिलेने रिक्षाचालकाला नकार दिला. यानंतर महिला बसची वाट बघत असता संशयिताने तुमको किधर जाना है, असे म्हणत हाताने अश्लील इशारे केले.

यानंतर महिला घाबरून गेली होती. काही वेळाने सिटीलिंकची बस तेथे आल्याने प्रवासी बसमध्ये बसले. बस द्वारकेच्या दिशेने निघाली असता रिक्षाचालक तिचा पाठलाग करत आहे, असे महिलेला जाणवले. द्वारका सर्कल येथे सिटीलिंक बस आली असता रिक्षाचालक आणि त्याच्या मित्राने रिक्षा बसला आडवी लावली. यानंतर रिक्षाचालकाने कपडे काढून तो नग्न झाला.

संशयित आरोपी तडीपार
त्याने सिटीलिंक बसचालक आणि वाहकाला देखील मारहाण केली. तसेच बसवर दगड फेकत बसच्या काचादेखील फोडल्या. यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी पोलिसांना फोन केला. काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित आरोपीला ताब्यात घेतले. संशयित रिक्षाचालक मिजान रजा ऊर्फ मल्ला सादिक शेख हा भद्रकाली, जुने नाशिक या परिसरात राहणारा आहे. यापूर्वी त्याच्यावर एक दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. १६ ऑगस्टच्या दंगलीतील तो आरोपी आहे. त्याला शहरातून तडीपार करण्यात आलेले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच संशयित आरोपीकडे असलेली रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR