19.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये पाच दिवसांचे बाळ चोरीला

नाशिकमध्ये पाच दिवसांचे बाळ चोरीला

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातून एका संशयित महिलेने पाच दिवसांच्या बाळाची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली. बाळाला लळा लावण्याचे नाटक करत एका महिलेने नवजात मातेचा विश्वास संपादन केला. यानंतर डिस्चार्जच्या वेळी ही महिला बाळाला बाबांकडे देते सांगत घेऊन गेल्याची बाब समोर आली आहे. सध्या पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मूळ उत्तर प्रदेशातील पण सध्या बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथे राहणारे अब्दुल खान यांची पत्नी सुमन ही प्रसूतीसाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. २८ डिसेंबर रोजी तिची प्रसूती झाली आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाचे वजन कमी असल्याने त्याला अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले होते. तर महिलेची सिझेरिअन प्रसूती झाली होती. प्रसूतीनंतर बाळ आणि आई दोघांना वेगवेगळया वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. या दरम्यान एका महिलेने तिच्याशी जवळीक साधली. ती बाळाशी खेळणे, एकत्र जेवण करणे, तिची काळजी घेऊ लागली.

यानंतर शनिवारी या बाळाला आणि महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी या महिलेने त्या बाळाच्या आईला तू आवरून बाहेर ये, तोपर्यंत मी बाळाला त्याच्या बाबांच्या हातात देते, असे सांगितले. यानंतर बराच वेळ झाल्यानंतर ती महिला आणि बाळ दिसत नव्हते. त्यामुळे त्या बाळाच्या आईने रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेचा शोध सुरू आहे. त्या महिलेनेच फसवून बाळ नेले, असा दावा रुग्णालयाने केला आहे. मात्र यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR