35.1 C
Latur
Sunday, March 23, 2025
Home‘नासा’ने शोधला हि-यांनी समृद्ध असलेला ग्रह

‘नासा’ने शोधला हि-यांनी समृद्ध असलेला ग्रह

 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
‘नासा’च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप या अंतराळ दुर्बिणीने लाँच झाल्यापासूनच अनेक नवे शोध लावले आहेत. आता या दुर्बिणीने एक वैशिष्ट्यपूर्ण असा ग्रह शोधला आहे. हा ग्रह हि-यांनी अक्षरश: भरलेला आहे! या ग्रहाबाबत बरेच संशोधन करण्यात आले असून पृथ्वीहून पाचपट मोठा असणारा हा ग्रह संपूर्णरीत्या हि-यांनी भरलेला असू शकतो, असा निष्कर्ष या शोधातून लावला जात आहे. शास्त्रज्ञांनी या ग्रहाला ‘५५ कॅन्क्री ई’ असं नाव दिलं असून तो पृथ्वीपासून ४१ प्रकाशवर्षे दूर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या संशोधनामुळे खगोलीय क्षेत्रात काही नव्या संकल्पना आणि संभावनांना वाव मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे. ‘५५ कॅन्क्री ई’ या ग्रहाला सध्या ‘सुपर अर्थ’ या श्रेणीत ठेवण्यात आलं असून त्याचा आकार पृथ्वीहून पाचपट असल्याचं सांगण्यात येतं. या ग्रहाचा एक मोठा भाग हिरे आणि ग्रॅफाईट यांसारख्या कार्बन संरचनांपासून तयार झाला असून, या संशोधनामुळं पारंपरिक ग्रह रचना आणि ब्रह्मांडातील विविधतेसंदर्भात अनेक गोष्टी लक्षात येत आहेत. नव्यानं शोध लागलेल्या या ग्रहाचं तापमान प्रचंड असून, तो आपल्या सू­र्यापासून अतिशय जवळ असल्यानं १७ तासांमध्ये आपल्या एका कक्षेतील परिक्रमा पूर्ण करतो. ज्यामुळं या ग्रहाचं तापमान २४०० अंश सेल्सिअस इतकं सांगण्यात येतं. इतक्या भीषण उष्णतेमध्ये जीवसृष्टीची शक्यता धूसर किंबहुना नसल्याचेच स्पष्ट होतं, असं संशोधकांचं निरीक्षण आहे.

या ग्रहावर असणारं वातावरण पूर्णपणे वेगळं असून शास्त्रज्ञांनी त्याच्या चारही बाजूंनी एका विशिष्ट वातावरणाची अर्थात ‘सेकंडरी ऍटमॉस्फिअर’च्या अस्तित्वाची शक्यताही वर्तवली आहे. या स्थितीमुळं ज्वालामुखीय क्रियेला वाव मिळतो, असंही सांगण्यात येत आहे. दुस-या एका अहवालानुसार आता शास्त्रज्ञ या ग्रहाच्या खोलीचा अभ्यास करत त्या माध्यमातून ब्रह्मांडात आणखी असे नेमके किती ग्रह अस्तित्वात आहेत याचा शोध घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR