सॅनफ्रान्सिस्को : वृत्तसंस्था
नासा लवकरच चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले मोबाईल नेटवर्क स्थापित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आहे. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम इन्ट्युटिव्ह मशीन्सच्या आयएम-२ मोहिमेचा एक भाग आहे. यामध्ये गुरुवारी चंद्रावरील पृष्ठभाग संप्रेषण प्रणाली स्थापित करण्यासाठी अथेना लँडर लाँच केले गेले.
नोकियाने विकसित केलेले एलएससीएस, पृथ्वीवर वापरल्या जाणा-या सेल्युलर तंत्रज्ञानाचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावर कनेक्टिव्हिटी स्थापित करणार आहे. हा प्रकल्प भविष्यातील मानवी मोहिमा आणि रोबोटिक शोधकार्यासाठी क्रांतिकारी ठरणार आहे, कारण चंद्राच्या पृष्ठभागावर स्थिर आणि विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी असणे अत्यावश्यक आहे.
हे मोबाइल नेटवर्क लँडर आणि चंद्र यानांमध्ये हाय-डेफिनिशन व्हिडीओ स्ट्रीमिंग, कमांड-अँड-कंट्रोल कम्युनिकेशन्स आणि टेलिमेट्री डेटा ट्रान्सफर सक्षम करेल. नोकिया बेल लॅब्स सोल्युशन्स रिसर्चचे अध्यक्ष थिएरी क्लेन यांच्या मते, हे नेटवर्क अंतराळातील कठीण परिस्थिती उदारहणार्थ प्रक्षेपण आणि लँडिंग दरम्यान अति तापमान, रेडिएशन आणि कंपनांना तोंड देण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
या मोबाईल नेटवर्कच्या यशामुळे नासाच्या आर्टेमिस प्रोग्रॅमचा पाया रचला आहे, याचा उद्देश २०२७ पर्यंत मानवांना चंद्राच्या पृष्ठभागावर परत आणणे आहे. चंद्रावरील शाश्वत मानवी क्रियाकलापांना समर्थन देण्यासाठी या नेटवर्कचा विस्तार करणे हे नोकियाचे दीर्घकालीन ध्येय आहे, यामध्ये भविष्यातील अंतराळवीरांसाठी स्पेससूटमध्ये सेल कम्युनिकेशन्स एकत्रित करणे समाविष्ट आहे.