कल्याण : प्रतिनिधी
कल्याण पूर्व भागात बनावट सिमेंट बनवून नामांकित सिमेंट कंपनीच्या बॅगमध्ये भरून विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निष्कृष्ट दर्जाचे सिमेंट नामांकित कंपनीच्या नावाने विक्री करण्याचा गोरखधंदा या ठिकाणी सुरू होता. काही जागरूक नागरिकांनी पोलिसांना या काळ्या उद्योगाची माहिती देत बनावट सिमेंट बनविणा-यांचे पितळ उघडे पाडले आहे.
बनावट वस्तू तयार करून विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी खाद्यपदार्थांचे देखील बनावट पदार्थ तयार करून ते नामांकित कंपनीच्या पॅकिंगमध्ये भरून विक्री केले जात असल्याचे प्रकार समोर आले आहे. आता अशाच प्रकारे बनावट सिमेंट तयार करण्याचा प्रकार कल्याण पूर्वमध्ये समोर आला आहे. विशेष म्हणजे या निष्कृष्ट दर्जाच्या सिमेंटला चाळण मारून पुन्हा सीलबंद करण्याचा उद्योग याठिकाणी सुरू होता.
लाखो रुपयांचे सिमेंट जप्त
सदरची जागा ही नरेश मिश्र यांची आणि ही कंपनी उल्हासनगरमधील नवीन भाटिया नामक व्यक्तीची असल्याची माहिती तेथे काम करत असलेल्या कामगारांनी दिली आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून चार ट्रकसह लाखो रुपयांचे निकृष्ट सिमेंट जप्त केले आहे. पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.