लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एकुण १ लाख ३ हजार ९५६ लाभार्थी आहेत. यातील १ लाख २ हजार ९२६ लाभार्थ्यांचे आधार अपडेट करण्यात आले आहे. कागदपत्रे सादर केलेल्या १ हजार ३० लाभार्थ्यांचे आधार अपडेट अद्यापही झालेले नाही. लातूर जिल्ह्यातील ९८ टक्के लाभार्थ्यांचे आधार अपडेट झालेले असतानाही अनेकांचे अनुदान गेल्या सहा महिन्यांपासून रखडल्याने निराधारांची अवहेलना थांबताना दिसत नाही.
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात निराधार लाभार्थ्यांना औषधोपचार व इतर खर्चासाठी शासनाकडू ६०० रुपये मासीक अनुदान दिले जाते. या अनुदानातून निराधारांचे जगणे सस व्हावे हा प्रमुख उद्देश शासनाचा आहे. त्यामुळे शासनाकडून निराधार नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. निराधार व्यक्ती पुर्णपणे दुस-यांवर अवलंबुन असल्याने शासनाच्या योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदतही करणे आवश्यक आहे. जेणे करुन या अनुदानातून किमान त्यांना आवश्यक औषधोपचार घेता यावेत.
निराधारांना अनुदान देण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आदी योजना राबवल्या जातात. दिवाळीनंतर एकदा चार हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर अनुदान मिळाले नाही. गेल्या सहा महिन्यांपासून निराधारांना अनुदान मिळाले नाही. त्यामुळे निराधार लाभार्थी आर्थिक अडचणीत आहेत. काही त्रुटींमुळे निराधारांचे अनुदान रखडल्याचे संबंधीत विभागाकडून सांगण्यात येत आहे.