निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातील धान्याची खुलेआम काळ्या बाजारात खरेदीविक्री होत आहे. यास तात्काळ आळा घालण्यात यावा अन्यथा छावा संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा तहसीलदारांकडे देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले, शासनाकडून गोरगरीब जनतेला दिला जाणारे राशनची खुलेआम काळ्या बाजारात विक्री खरेदी केली जात आहे. सरकारी राशन खरेदी व विक्रीकरिता बंदी असूनही हा माल सर्रास भुसार दुकानात विक्री केला जात आहे. मात्र प्रशासन गप्प का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर नेमका धाक कुणाचा? राशनच्या मालाची खुलेआम बाजारात विक्री केली जात आहे.
यावर वरदहस्त कोणाचा?खरेदी विक्री केलेला माल बिनधास्तपणे वाहतूक करीत आहेत. ते तत्काळ बंद करावा, भुसार दुकानात स्वस्त धान्य खरेदी करण्यावर बंदी घालावी, शहरातील दुकानदांराना नोटीस काढण्यात यावी व यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा छावा संघटना तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदारांना देण्यात आला आहे. या निवेदनावर छावाचे तालुका कार्याध्यक्ष गुणवंत शिरसल्ले,विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष वैभव गोमसाळे आदीच्या स्वाक्ष-या आहेत.