23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरनिलंगा पाणीपुरवठा योजनेला टाळे

निलंगा पाणीपुरवठा योजनेला टाळे

निलंगा : प्रतिनिधी
निम्न तेरणा धरण व जलाशय उपसा सिंचन प्रकल्प माकणी या विभागांने निलंगा पालिकेकडे ४५ लाख रुपये थकबाकी असल्याने पाणीपुरवठा यंत्रणेला टाळे  ठोकल्यामुळे निलंगा शहराचा पाणीपुरवठा बंद असून शहरात सर्वत्र पाण्याचा हाहाकार उडाला आहे. तर  ऐन रमजान व होळीच्या सणाला या कृत्रिम पाणीटंचाईमुळे निलंगेकर त्रस्त झाले आहेत.
निलंगा शहराला माकणी धरणातून ४० किलोमीटर पाईपलाईन अंथरून तात्कालीन माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंजूर करून शहराला पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर पंचवीस वर्षांनी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी या पाईपलाईनचे नूतनीकरण केले व पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न केला. मात्र या पाणीपुरवठा पाईपलाईन मध्ये मोठ्या प्रमाणात दोष असून नेहमीच पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत होते. कधी लाईट बिल न भरल्यामुळे तर कधी तांत्रिक बिघाडामूळे बंद असते आता तर चक्क लोअर तेरणा विभागाने ४५ लाख पाणीपट्टी थकीत असल्यामुळे माकणी येथील पाणीपुरवठा यंत्रणेलाच टाळे ठोकले. मग मात्र कर्मचा-यांची पळापळ चालू झाली व नगरपालिका कर्मचा-यांनी व माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी माकणी धरण येथे जाऊन संबंधित अधिका-यांशी चर्चा केली व सध्या रमजान व होळीच्या सण असल्यामुळे पाणीपुरवठा चालू करू द्या अशी विनंती केली मात्र संबंधित अधिका-यांनी ४५ लाखापैकी ५०% रक्कम भरली तरच पाणीपुरवठा चालू होईल अन्यथा नाही अशी भूमिका घेतल्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणा अडचणीत आली आहे.
शुक्रवार ते रविवार कार्यालयीन सुट्टी असल्यामुळे एवढ्या पैशाची जुळवाजुळव करायची कशी हा पेच पालिका यंत्रनेसमोर आहे. धरणात पाणी आहे, पाणीपुरवठा योजना नवीन कार्यान्वित केलेली आहे मात्र केवळ नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे कधी लाईट बिल थकीत, तर कधी तांत्रिक दोष, तर कधी पाणीपट्टीमुळे या कृत्रिम टंचाईमुळे निलंगा शहर वाशीयांना ऐन उन्हाळ्यात तसेच रमजान व होळीच्या सणा निमित्त पाण्यासाठी वन वन फिरावे लागत असल्याचे विदारक चित्र शहरात दिसून येत आहे. तरी स्थानिक लोकप्रतिनिधीनी यामध्ये लक्ष घालून ही पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत चालू करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR